पुणे : अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीच्या उत्तरेला चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऐन पावसाळ्यात चक्रीवादळ तयार होणे ही दुर्मीळ बाब असून, १८९१पासून आतापर्यंत केवळ १९६४ या वर्षी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले होते. त्यामुळे अरबी समुद्रात ऑगस्टमध्ये चक्रीवादळ तयार होण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे.
सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या आधी एप्रिल-मे महिन्यात आणि पाऊस माघारी गेल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर हा काळ चक्रीवादळे तयार होण्याचा मानला जातो. त्यामुळे सहसा पावसाळ्यात चक्रीवादळे तयार होत नाहीत. मात्र कच्छ, सौराष्ट्रवर असलेले दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे. ३० ऑगस्ट रोजी या दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ईशान्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत राहील. त्यामुळे भारतीय किनारपट्टीला या चक्रीवादळाचा धोका नाही. मात्र, गुजरातच्या सौराष्ट्र, कच्छ येथील काही भागांत मध्य ते अतिमुसळधार पावसाची, तसेच ४५ ते ६५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>पुणे : कुख्यात गुन्हेगार पिस्तूलासह जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई
हवामान विभागाकडे असलेल्या १८९१पासूनच्या नोंदीनुसार अरबी समुद्रात ऑगस्टमध्ये चक्रीवादळ तयार होण्याची घटना १९६४मध्ये नोंदवली गेली होती. त्यानंतर गेल्या ६० वर्षांत ऐन पावसाळ्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ झाल्याची नोंद नाही. त्यामुळे यंदाचे चक्रीवादळ हे १८९१पासून ऑगस्टमध्ये अरबी समुद्रातील केवळ दुसरेच चक्रीवादळ असल्याची माहिती हवामान विभागातील सूत्रांनी दिली.
चक्रीवादळाचे वेगळेपण
सर्वसाधारणपणे पावसाळ्यात चक्रीवादळाची निर्मिती होत नाही. त्यामुळे ऑगस्टमध्ये चक्रीवादळ तयार होणे ही दुर्मीळ घटना आहे. भूभागावर दाब क्षेत्र लवकर विरळ होते. मात्र कच्छ, सौराष्ट्र येथे असलेले दाब क्षेत्र टिकून राहिले आहे. आता ते अरबी समुद्रात जाऊन त्याच्या तीव्रतेत वाढ होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. हे या चक्रीवादळाचे वेगळेपण आहे, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.