लोकसत्ता, प्रतिनिधी
पुणे: बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे वाटचाल करीत आहे. चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान जाखू बंदराच्या उत्तरेकडील भागात धडकेल. चक्रीवादळ मोसमी पावसासाठी पूरकच ठरले आहे, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे.
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना महापात्रा म्हणाले, चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चार ते आठ वाजण्याच्या दरम्यान जाखू बंदाराच्या उत्तरेकडील भागात धडकेल. या वेळी वाऱ्याचा वेग १५० किमोमीटर प्रती तासांवर जाण्याची शक्यता आहे. कच्छ परिसराला वेगवान वारे आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसेल. कच्छसह देवभूमी द्वारका, मोरबी, पोरबंदर, राजकोट परिसरात १२५ ते १३५ किलोमीटर वेगाने वारे वाहील. वाऱ्याचा वेग ताशी १४५ किलोमीटरपर्यंत जावू शकतो. कच्छ आणि देवभूमी द्वारका जिल्ह्यांत सर्वाधिक हानी होऊ शकते. गुजरातच्या अन्य भागात पावसाची शक्यता आहे. राज्यस्थान दक्षिण भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मोसमी पावसासाठीचा अंदाज काय
चक्रीवादळ गुरुवारी, सायंकाळी जाखू बंदर परिसरात धडकेल, त्यानंतर वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होऊन चक्रीवादळाचा प्रभाव संपून जाईल. साधारण अठरा जूनपर्यंत चक्रीवादळाचा प्रभाव राहील. १८ जून ते २१ जून दरम्यान मोसमी वारे वेगाने वाटचाल करून संपूर्ण दक्षिण भागात व्यापून पुढे वाटचाल करतील. केरळमध्ये उशिराने दाखल झालेला मोसमी पाऊस चक्रीवादळामुळे वेगाने पुढे सरकला. चक्रीवादळाचा प्रभाव संपताच मोसमी वाऱ्यांचा वेग आणखी वाढेल. चक्रीवादळ ओमानच्या दिशेने गेले असते तर मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला असता. मात्र, देशाच्या किनारपट्टीकडे सरकल्यामुळे देशाच्या काही भागात चांगला पाऊस होईल.
मोसमी पावसाची मोजणी कशी होते
देशात नैर्ऋत्य मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून, तो पूर्णपणे माघारी जाईपर्यंत देशात पडणारा पाऊस मोसमी पाऊस म्हणूनच गणला जातो. मोसमी पाऊस म्हणूनच त्यांची मोजणी होते. या काळात चक्रीवादळ, वादळ, स्थानिक वातावरणाचा परिणाम म्हणून पाऊस पडला तरीही त्याची गणना मोसमी पावसातच केली जाते, असेही महापात्रा म्हणाले.