पुणे : बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची, तसेच येत्या चार दिवसांत चक्रीवादळाची निर्मिती होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात १६ नोव्हेंबरला होणाऱ्या सेमीफायनलच्या सामन्यावर चक्रीवादळाचे सावट असून, त्या दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी सर्वसाधारणपणे मोसमी पावसापूर्वी आणि मोसमी पावसानंतरचा काळ पोषक मानला जातो. त्यानुसार सध्या बंगालच्या उपसागरात असलेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीची वाटचाल चक्रीवादळापर्यंत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी मोसमी पावसानंतर ऑक्टोबरमध्ये बंगालच्या उपसागरात सितरंग चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.दिल्लीच्या प्रादेशिक विशेष हवामानशास्त्रीय केंद्राने (आरएसएमसी) दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होऊ शकते. तसेच ते वायव्य दिशेला सरकत १६ नोव्हेंबरच्या सुमारास तीव्रता वाढून त्याचे दाब क्षेत्रात रुपांतर होऊ शकेल. त्यामुळे येत्या चार दिवसांत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्मितीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा >>>पक्ष कोणताही असला तरी सर्व उत्सव एकत्रितपणे साजरे केले पाहिजे – चंद्रकांत पाटील
या पार्श्वभूमीवर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेमीफायनलचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. या सामन्यातील विजेता अंतिम फेरीत प्रवेश करणार असल्याने क्रिकेटप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. मात्र चक्रीवादळाची स्थिती, त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे सावट या सामन्यावर आहे.