पुण्यातले प्रसिद्ध उद्योगपती आणि सीरम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना गुरुवारी (१६ नोव्हेंबर) सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर काही वेळापूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टर पुर्वेझ ग्रँट आणि डॉक्टर अभिजीत खर्डेकर यांनी ही शस्त्रक्रिया केली. पूनावाला यांची प्रकृती आता स्थिर असून ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. रुबी हॉल क्लिनिकने म्हटलं आहे की, सायरस पूनावाला यांची प्रकृती आता बरी होत आहे.
दरम्यान, रुबी हॉल क्लिनिकने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की गुरुवारी सायंकाळी सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्वरित त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. आज सकाळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून पूनावाला यांची तब्येत आता सुधारत आहे.
सायरस पूनावाला हे पुण्यातले प्रसिद्ध उद्योगपती आहेत. कोरोना काळात त्यांचं नाव चर्चेत आलं होतं, कारण त्यांच्या सीरम इन्स्टिट्युटने कोव्हिड-१९ या आजारावरील लस तयार करण्यासाठी कारखाना उभारण्यासाठी ८०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. सीरम इन्स्टिट्युटने बनवलेली कोव्हिशिल्ड ही करोनावरील लस देशभरात वापरण्यात आली. भारत सरकारने ही लस इतर देशांनाही पुरवली.