मराठी साहित्य संमेलन घुमानला होणे साहित्य, सामाजिक व राजकीय दृष्टय़ाही अत्यंत महत्त्वाचे आहे. या संमेलनाच्या निमित्ताने नामदेवाचे जीवनकार्य व वाङ्मयीन कार्याचे पुनर्मूल्यांकन झाले पाहिजे. नामदेव महाराज घुमानला पायी गेले व वीस वर्षे राहिले, पण आपल्या पाया पडूनही आपण जात नाही. त्यामुळे आपलेच पुनर्मूल्यांकन केले पाहिजे, असे परखड मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी कोणाचेही नाव न घेता मांडले.
पंजाबमधील घुमान येथे ‘सरहद’च्या वतीने आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘घुमान साहित्य संमेलन – माजी संमेलनाध्यक्षांच्या नजरेतून’ हा परिसंवाद झाला. त्यात दभि बोलत होते. नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. राजेंद्र बनहट्टी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, ‘सरहद’चे संजय नहार त्या वेळी उपस्थित होते.
दभि म्हणाले, मी तरुण असतो, तर संमेलनासाठी घुमानला पदयात्रा करीत गेलो असतो. केवळ घुमानच नव्हे, तर देशातील इतर शहरांचाही मराठीचा संबंध शोधला पाहिजे. त्यासाठी मराठी साहित्याचा अखिल भारतीय वाङ्मयीन नकाशा तयार केला पाहिजे. सर्व साहित्यामध्ये संत साहित्य श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्याची समीक्षा झालीच पाहिजे. नामदेव महाराजांची समीक्षा इतर संतांच्या तुलनेत कमी झाली. या संमेलमाच्या निमित्ताने नामदेवांच्या कार्याचे पुनर्मूल्यांकन झाले पाहिजे. ते झाले तर ‘नामा आकाशा एवढा’ हे कळेल.
मोरे म्हणाले, नामदेव महाराजांनी पंजाबला प्रेमाने जिंकले. पंजाबातील लोकांनी त्यांची शिकवण व काव्य आपले मानले. मराठय़ांनी अब्दालीला परतवून लावत पंजाबचे रक्षण केले. शिखांच्या राज्याला अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील लोकांनी मदत केली. त्यामुळे घुमानला जायचे नाही, तर मग कुठे जायचे? नामदेवांना अभिवादन करण्यासाठी तिथे जायचे आहे. आपण आपापल्या जातीचा इतिहास सांगतो, पण आपला सर्वागीण इतिहास भारतभर सांगितला पाहिजे. त्यासाठी घुमानसारखी जागा नाही.
बनहट्टी म्हणाले, मराठी माणसांचा वाङ्मयीन उत्सव घुमानला साजरा होणे अपूर्व गोष्ट आहे. आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणत असताना ते राज्यापुरते मर्यादित न राहता भारतभर होणे गरजेचे आहे. मराठी साहित्याची समृद्ध परंपरा व इतिहासाची जाणीव इतर भाषिक साहित्य प्रेमींनाही करून दिली पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा