dabhi_kulkarniज्येष्ठ समीक्षक, ललित लेखक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. दत्तात्रय भिकाजी ऊर्फ द. भि. कुलकर्णी (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा आणि नात असा परिवार आहे.
गेल्या दशकभरापासून दभि पुण्यामध्ये वास्तव्याला होते. नुकत्याच पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ते सहभागी झाले होते. संमेलनाच्या अखेरच्या दिवशी (१८ जानेवारी) अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. पुण्यामध्ये झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद द. भि. कुलकर्णी यांनी भूषविले होते.
द. भि. कुलकर्णी यांचा जन्म २५ जुलै १९३४ रोजी झाला. नागपूर येथे शिक्षण घेतलेल्या दभिंनी १९६७ मध्ये पीएच. डी आणि विदर्भ साहित्य संघाची साहित्य वाचस्पती ही डी. लिट समकक्ष पदवी संपादन केली. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विभागात प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले होते.
साहित्यसंपदा
कथासंग्रह – रेक्वियम,
ललित लेखसंग्रह – मेघ, मोर आणि मैथिली
समीक्षापर लेखन – दुसरी परंपरा, महाकाव्य : स्वरूप आणि समीक्षा, ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद, पहिली पंरपरा, तिसऱयांदा रणांगण, चार शोधनिबंध, पार्थिवतेचे उदयास्त, नाटय़वेध, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र, प्रतीतिविश्रांती, युगास्त्र, द्विदल, पहिल्यांदा रणांगण, अपार्थिवाचे चांदणे, मर्ढेकरांची अनन्यता
———————————————————-
साक्षेपी समीक्षक गमावला – मुख्यमंत्री
ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या निधनाने आपण एक महत्त्वाचा साक्षेपी लेखक-समीक्षक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, डॉ. कुलकर्णी यांनी मराठी साहित्यातील एकूणच समीक्षेला नवा आयाम दिला. केवळ समीक्षाच नव्हे तर त्यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारे लिखाण केले. त्यांचे ग्रंथ अभ्यासकांना सदैव मार्गदर्शक ठरतील. त्यांनी काव्य, ललित लेख, कथा आणि समीक्षा असे विविध साहित्यप्रकार प्रभावीपणे हाताळले. ज्ञानेश्वरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अध्यापनाचा विषय होता. डॉ. कुलकर्णी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून मराठी साहित्यविश्वाने त्यांच्या समीक्षेचाच जणू गौरव केला होता. त्यांच्या निधनाने केवळ अभ्यासू समीक्षकच नव्हे, तर साहित्याचा एक चांगला आस्वादक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आपण गमावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा