पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद आणि कन्या मुक्ता यांनी निकालाबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात तपास यंत्रणेला अपयश आल्याने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
निकालानंतर डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की या खटल्यात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली, ही समाधानाची बाब आहे. मात्र, हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात तपास यंत्रणेला अपयश आले आहे. अद्याप मी निकालपत्र वाचलेले नाही. पुण्यातील विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. दरम्यान, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश आदी विवेकवाद्यांची हत्या हा व्यापक कटाचा भाग आहे. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात आरोपींना झालेली शिक्षा योग्य आहे. त्यांना फाशीची शिक्षा दिली नाही. मानवतेला धरून फाशीची शिक्षा देणे योग्य झाले नसते. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे पानसरे आरोपी आहे. तपास यंत्रणेने मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे गरजेचे आहे,’ अशी मागणी गोविंद पानसरे यांची सून मेघा पानसरे यांनी केली.
हेही वाचा >>>मोदींच्या जाहीरनाम्यात राज्यघटनेची गॅरेंटी नाही, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची टीका
‘सीबीआय’च्या वकिलांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात पुरावे सादर केले होते. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना न्यायालयात ओळखले होते. या खटल्यात दोन आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपींना शिक्षा होणे गरजेचे असून, आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. – अॅड. अभय नेवगी, दाभोलकर कुटुंबीयांचे वकील
दाभोलकर हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात अपयश आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणात अपील दाखल करावे. निकाल देण्यास काही वर्षे लागली. या निकालाने दाभोलकर यांच्या आत्म्याला काही प्रमाणात न्याय मिळेल.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
दाभोलकरांच्या हत्येचा कट कुठे शिजला, त्यातील मुख्य आरोपी कोण, अशा अनेक बाबी दडपण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा योग्य तपास झाला नाही. सनातन संस्थेचा संबंध असल्याचा संशय होता, त्यासंदर्भात योग्य तपास करण्यात आलेला नाही. – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे साधक निर्दोष असल्याचा निकाल आहे. या हत्येमध्ये हिंदू दहशतवादाचा संबंध असल्याचे षडय़ंत्र पुरोगामी चळवळ आणि शहरी नक्षलवाद्यांनी रचले होते. मात्र, हा निकाल म्हणजे हिंदू दहशतवादाचे कुभांड रचणाऱ्यांचा पराभव आहे.- अभय वर्तक , प्रवक्ते, सनातन संस्था