पुण्यातील न्यायालयात हजर
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) नवी मुंबईतून हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक केल्यानंतर त्याला शनिवारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तावडे याला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एन. शेख यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सीबीआयचे वकील अॅड. बी. पी. राजू यांनी तावडे याला सीबीआय कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली.
युक्तिवाद करताना अॅड. राजू म्हणाले, की गोव्यातील मडगाव येथे सन २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सारंग अकोलकर याचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापूर्वी तावडे हा अकोलकर याच्याशी ईमेलद्वारे संपर्कात होता. कोल्हापूर येथे सन २००४ मध्ये झालेल्या सभेत तावडे याने त्याच्या भाषणातून डॉ. दाभोलकर यांना धमकी दिली होती. या संदर्भात कोल्हापुरातील एकाने सीबीआयकडे जबाब नोंदविला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या मारेक ऱ्यांनी काळ्या रंगाची दुचाकी वापरली होती. तावडे याच्याकडे काळ्या रंगाची दुचाकी होती. कर्नाटकातील विचारवंत, साहित्यिक एम. एम. कलबुर्गी, कोल्हापूर येथील कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येत साम्य आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी तावडे याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी. तावडे हा तीन मोबाइल संच वापरत होता. त्याद्वारे तो मारेक ऱ्यांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. या तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात येणार आहे.
तावडे याच्या वतीने अॅड. संजीव पुनाळेकर यांनी बाजू मांडली. तावडे याला दोन दिवसांची कोठडी देण्याची विनंती त्यांनी युक्तिवादात केली. युक्तिवादात अॅड. पुनाळेकर म्हणाले, की सीबीआयने १ जूनपासून तावडे याची चौकशी सुरू केली होती. त्याला केवळ संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्या घराची झडती देखील घेण्यात आली. परंतु तेथे काही सापडले नाही. तावडे याच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसताना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तावडे याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
मारहाण केल्याचा आरोप
तावडे याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन थपडा लगावल्याचा आरोप न्यायालयाकडे केला. तेव्हा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तावडे याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्या संदर्भातील प्रमाणपत्र न्यायालयासमोर सादर केले. त्यात तावडे याला मारहाण करण्यात आली नसल्याचे म्हटले होते. तावडे याचा आरोप फेटाळून लावत न्यायालयाने कामकाज सुरू केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा