महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला डॉ. वीरेंद्र तावडे याची सीबीआयकडून (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, तावडे तपासात सहकार्य करत नसल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तावडेची सत्यशोधन चाचणी  करण्यासाठी न्यायालयाकडे विनंती करण्यात येणार आहे.

डॉ. दाभोलकर खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तावडे याच्या सीबीआय कोठडीची मुदत गुरुवारी (१६ जून) संपणार आहे. तावडे याला गुरुवारी पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल. डॉ. दाभोलकर यांच्या खूनप्रकरणाचा तावडे मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयला संशय आहे. तावडे याची कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, तावडे चौकशीत सहकार्य करत नाही तसेच विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरे देत नाही. त्यामुळे त्याची सत्यशोधन चाचणी करण्याची मागणी सीबीआयकडून करण्यात येणार आहे. सत्यशोधन चाचणीत अनेक गोष्टींचा उलगडा होईल. तावडे याची सत्यशोधन चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात येणार आहे, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. सीबीआयने पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमातून हार्डडिस्क जप्त केली आहे. तावडे आणि मडगाव बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी सारंग अकोलकर यांच्यात ईमेलद्वारे संवाद झाला आहे. बॉम्बस्फोट घडविण्यापूर्वी तावडे याने डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा कट रचला होता.

धर्मनिष्ठ मारेक ऱ्यांचा शोध

तावडे हा धर्मनिष्ठ मारेक ऱ्यांच्या शोधात होता. डॉ. दाभोलकर यांचा खून धर्मनिष्ठ मारेक ऱ्यांच्या मदतीने तावडे याने घडवून आणला. तावडे आणि अकोलकर यांच्या ईमेल संवादात सात जणांचा उल्लेख आढळून आला आहे. त्यांची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खूनप्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

 

 

Story img Loader