पुणे : आई आणि वडिलांचे भांडण सुरू असताना आईवर पिस्तूल रोखलेले पाहून पप्पा आईला मारू नका असे म्हणणार्या आठ वर्षीय राजनंदिनीवर तिच्या वडीलांनी गोळी झाडल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे आठ वर्षीय जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. मुलीवर गोळी झाडल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील पांडुरंग उभे यास अटक केली आहे.
सिंहगड पोलिस स्टेशनचे शैलेश संखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील हेरंब हाइट्समध्ये आरोपी पांडुरंग उभे हे पत्नी आणि मुली यांच्यासोबत वास्तव्य करतात. आरोपी पांडुरंग हे बांधकाम व्यावसायिक असून मागील काही दिवसापासून व्यवसायात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच आरोपीला दारूचे व्यसन असल्याने तो दररोज दारू पिऊन घरी आल्यावर पत्नी सोबत भांडण करायचा. अशाच प्रकारचे भांडण काल रात्री देखील आरोपी पांडुरंग आणि त्याच्या पत्नीमध्ये झाले.
हेही वाचा : अमली पदार्थ विक्री प्रकरणात परदेशी नागरिक गजाआड; सात लाखांचे मेफेड्रोन जप्त
भांडण विकोपाला गेल्यामुळे आरोपीने त्याच्या जवळ असलेले पिस्तूल आपल्या पत्नीवर रोखली. हे आठ वर्षीय राजनंदिनी हिने पाहिले आणि दोघांच्या भांडणात ती पडली. पप्पा आईला मारू नका असे म्हणणाऱ्या राजनंदिनीवर आरोपी पांडुरंग याने गोळी झाडली. या घटनेत राजनंदिनी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी पांडुरंग उभे याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.