शहरातील पालक मुलांच्या करिअरविषयी जास्त जागरूक असतात, असे वाटत असले तरी ही जागरूकता पाल्यांना सोयीसुविधा पुरविण्याच्या बाबतीत जास्त असते. मात्र कोणत्याही सोयीसुविधा नसताना पाल्यांना विद्यार्जनासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असते आणि हेच महत्त्वपूर्ण काम आशा साळुंकेच्या आजोबांनी केले. त्यांचा आदर्श शहरातील पालकांनी घ्यावा, असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ विनोदी अभिनेते सुनील गोडबोले यांनी व्यक्त केले.
पुण्यातील दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार’ यंदा हलाखीच्या परिस्थितीवर मात करून दहावीत ९३ टक्के गुण मिळवणारी आशा ज्ञानदेव साळुंके आणि तिचे आधारस्तंभ आजोबा केरबा दगडू साळुंके यांना देण्यात आला. त्या वेळी गोडबोले बोलत होते. या वेळी फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते, सचिव डॉ. राजेंद्र भवाळकर, विश्वस्त परशुराम शेलार, खजिनदार विक्रम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. बारामतीतील डोल्रेवाडी येथील आशा ज्ञानदेव साळुंके हिचे आईवडील मूकबधिर आणि मतिमंद आहेत. घरच्या गरिबीमुळे तिचे ८५ वर्षांचे आधारस्तंभ असलेले आजोबा केरबा दगडू साळुंके हे हातगाडी चालवितात. अशा परिस्थितीत तिने दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवले. त्याबद्दल तिला आणि तिच्या आजोबांना यंदाचा हा पुरस्कार देण्यात आला. अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. आशाचे शिक्षक विजय तानाजी महापुरे यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
गोडबोले म्हणाले, की आशाच्या घरातील सगळी परिस्थिती पाहता तिचे यश हे खरोखरच अवाक करणारे आहे. अनेक जण आपल्या अपयशाचे खापर परिस्थितीवर फोडतात. मात्र, शिक्षणाकडे आणि आयुष्याच्या ध्येयाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, हे आशाने आणि तिच्या आजोबांनी स्वतच्या उदाहरणातून सिद्ध करून दाखविले आहे. या वेळी आशा म्हणाली, की माझ्या ध्येयाला आजोबांनी पाठबळ दिले. ते माझ्या आयुष्याचे आधारस्तंभ असून असे आजोबा मला मिळाले. हे माझे मोठे भाग्यच आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते यांनी केले.

Story img Loader