पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना सकाळी जाहीर पाठिंबा देणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी अवघ्या काही तासांतच घूमजाव करत सायंकाळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा जाहीर केला. त्याबाबतची ध्वनिचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक प्रतापराव गोडसे परिवाराचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपाला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली असतानाच गोडसे यांनी ध्वनिचित्रफित प्रसारित करत ही चर्चा थांबविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अन्य काही प्रमुख गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर केसरीवाड्यात चर्चा केल्यानंतर गोडसे यांनी ध्वनिचित्रफित प्रसारित केली.
महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत रासने हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख आहेत. अक्षय गोडसे यांची एक मिनीट कालावधीचे मनोगत असलेली दृक-श्राव्य ध्वनिफीत गुरुवारी सकाळी समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली. ट्रस्टचा पदाधिकारी उमेदवार असताना प्रतिस्पर्धी उमेदवाराला शुभेच्छा देण्याच्या अक्षय गोडसे यांच्या कृतीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली होती.
रवींद्र धंगेकर आणि आमच्या परिवाराचे गेल्या अनेक वर्षांचे नाते आहे. माझे आजोबा आणि ट्रस्टचे संस्थापक तात्यासाहेब गोडसे यांच्यापासून अशोक गोडसे ते माझ्यापर्यंत आणि सगळ्या परिवाराशी त्यांचे स्नेहाचे आणि अत्यंत चांगले नाते आहे. तात्यासाहेबांच्या प्रत्येक वाढदिवसाला रवींद्र भगवद्गीतेच्या एक हजार प्रती नागरिकांना त्यांच्या प्रभागामध्ये वितरित करत असत. गेली अनेक वर्षे ते आमच्या घरी येतात. अशोकभाऊंशी त्यांचे चांगले संबंध होते. अशोकभाऊंच्या वाढदिवसाला घराखाली रांगोळी काढण्यापासून ते वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करेपर्यंत सगळी जबाबदारी रवींद्र घरातील माणूस असल्याप्रमाणे घ्यायचे. आमच्या परिवाराशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या भावी वाटचालीला मी मनापासून शुभेच्छा देतो, असे सांगत अक्षय गोडसे यांनी रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र त्यानंतर सायंकाळी अचानाक त्यांनी घूमजाव करत हेमंत रासने यांना पाठिंबा दर्शविला.
हेही वाचा – कसब्यात मनसेला खिंडार, हकालपट्टीनंतर ५० कार्यकर्त्यांचे राजीनामे
हेमंत रासने यांच्याशी माझा पंचवीस वर्षांपासून स्नेह आहे. ट्रस्टचा कार्यकर्ता म्हणून ते सातत्याने चांगले काम करतात. प्रत्येक कार्यात त्यांचा सातत्याने पुढाकार असतो. रासने विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत. सत्तर ते ऐंशी वर्षे रासने-गोडसे कुटुंबाचा घरोबा आहे. जेव्हाजेव्हा ते नगरसेवक झाले तेव्हातेव्हा ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला येतात. तात्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या कार्यकर्त्याला आणि विश्वसाताला पाठिंबा जाहीर करतो, असे अक्षय गोडसे यांनी म्हटले आहे.