पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे १३२ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते.उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे साकारण्यात येणार आहे,अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक अमन विधाते आणि दिपाली विधाते यांच्या हस्ते पार पडला.यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा…पुणे : पार्सल देण्याच्या बहाण्याने सोसायटीच्या सुरक्षारक्षकानेच…

यावेळी अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले की,हिमाचल प्रदेशच्या सोलनमधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे.जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटावरून पडले आहे.हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे.पुराणातील उल्लेखानुसार भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते,असे मानले जाते.तर जटोली मंदिर विशिष्ट अशा दक्षिण-द्रविड वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे आणि ते सलग तीन पिरॅमिड ने बनलेले आहे. पहिल्या पिरॅमिडवर गणेशाची प्रतिमा तर दुसऱ्या पिरॅमिडवर शेष नागाची प्रतिमा दिसते. हे मंदिर बांधण्यासाठी ३९ वर्षे लागली आहेत.या मंदिराची उंची अंदाजे १११ फूट आहे. मंदिरातील दगडांवर थाप मारल्यावर डमरू सारखा आवाज देखील येतो. ते भव्य दिव्य मंदिर लक्षात घेऊन यंदाच्या गणेशोत्सवात जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून मंदिराचा आकार १२५ फूट लांब,५० फूट रंद आणि १११ फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dagdusheth halwai sarvajanik ganpati trust going to create replica of jatoli shiv temple for 132 nd ganeshotsav svk 88 psg