विद्या बालन, बिपाशा बासू, जॅकलिन फर्नाडिस, करिश्मा कपूर, डेजी शहा.. ही कुठल्या चित्रपटाची ‘स्टारकास्ट’ नाही, तर हिंदी व मराठी चित्रपटांतील अशा डझनाहून अधिक तारकांना हवी तितकी बिदागी देऊन दहीहंडीच्या उत्सवात गर्दी जमविण्यासाठी आणले जाणार आहे. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे आता कुणालातरी किंवा कुणाच्यातरी ‘दादा’, ‘भाऊ’, ‘अप्पा’ ला निवडणूक लढवायची असल्याने ‘होऊ हे खर्च’ म्हणत दहीहंडीत कोटय़वधींचा चुराडा करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. विशेष म्हणजे या उधळपट्टीला कोणत्याही पक्षाची मंडळी अपवाद नाहीत.
क्रेनच्या साहाय्याने उंचावर टांगलेली हंडी, कानठळ्या बसविणाऱ्या डीजेच्या तालावर बेधुंद नाचणारी तरुणाई व गर्दी जमविण्यासाठी एखाद्या दुसऱ्या सेलिब्रिटीचा सहभाग.. हे दहीहंडी उत्सवाचे सध्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. आयोजकांना शक्तिप्रदर्शनाची ही मोठी संधी असते. भररस्त्यात लावलेल्या हंडय़ांमुळे वाहतुकीला अडथळा होतो, पण त्याचे आयोजकांना काहीही देणेघेणे नसते. अशाच दहीहंडय़ांची परंपरा यंदाही पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरात कायम राहणार असल्याचे दिसत असून, शहराच्या विविध भागात या हंडय़ांच्या जाहिरातीचे फलक लागले आहेत. बाणेर, बावधन, बालेवाडी, धायरी, वडगाव, हडपसर, शिवाजीनगर, शहरातील मध्यवर्ती भागात काही ठिकाणी त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये  वाकड, पिंपळे सौदागर, पिंपरीगाव, चिंचवडगाव, भोसरी, सांगवी, दापोडी आदी भागात हे फलक झळकत आहेत.
विद्या बालन, बिपाशा बासू, जॅकलीन फर्नाडिस, करिश्मा कपूर, डेजी शहा, मुग्धा गोडसे, प्राची देसाई, ऊर्मिला कानेटकर, प्रिया बापट, प्राजक्ता माळी, नेहा पेंडसे, रिचा परियल्ली ते ‘फॅन्ड्री’तील नवोदित राजेश्वरी खरात यांसारखे अनेक कलावंत यंदा दहीहंडीसाठी हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे यंदा अभिनेत्यांना नव्हे, तर केवळ अभिनेत्रींना उत्सवात सहभागी करून घेण्यात आले आहे. ‘श्रीमंत’ शहराचा नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकांच्या तोंडावर शक्तिप्रदर्शनाची तीव्र चढाओढ आहे. त्यातूनच प्रत्येकाने सिनेतारकांच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याची खेळी केली आहे. सिनेकलाकारांचे मानधन त्याचप्रमाणे दहीहंडी फोडण्यासाठीही लाखो रुपयांची बक्षिसे लावण्यात आली आहेत. डामडौलासाठीही लाखो रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
 ‘होऊ दे खर्च’ ते ‘तुमच्यासाठी कायपण’!
 गर्दी जमविण्यासाठी दहीहंडी उत्सवात सिनेतारका आणण्यासाठी ‘होऊ दे खर्च’ ते ‘तुमच्यासाठी कायपण’ पर्यंतचा फंडा वापरला जातो. कलाकार मंडळी मिळवून देण्यासाठी काही अधिकृत संस्था टक्केवारीवर काम करतात.  हिंदी चित्रपटातील तारका केवळ अध्र्या तासांच्या उपस्थितीसाठी पाच लाख रुपये, तर मराठी तारका एक लाख रुपयांपर्यंत मानधन घेतात. त्यांच्या मागणीनुसार विमानप्रवास तसेच पंचतारांकित हॉटेलात राहण्याची व्यवस्थाही केली जाते, असे एका आयोजकाने सांगितले. हंडी फोडण्यासाठी बक्षिसाच्या रकमेतही सध्या चढाओढ लागली असून, एक लाखांपासून थेट २५ लाखांपर्यंत बक्षिसांची रक्कम पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा