दिवसाआड करण्यात आलेला पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गुरूवारपासून पुन्हा एकवेळ करण्यात येणार आहे. मात्र, पाणीकपातीसाठी घेतलेले अन्य निर्णय जसेच्या तसे यापुढेही लागू राहणार आहेत, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या आठवडय़ात समाधानकारक पाऊस झाल्याचे सांगत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत पाणीकपात धोरणात थोडा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, दिवसाआड ऐवजी पूर्वीप्रमाणे एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्याच्या वेळाही पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. १५ दिवसानंतर याबाबतचा आढावा घेऊन पुढील भूमिका जाहीर केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. या वेळी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे, पक्षनेत्या मंगला कदम, गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेविका सीमा सावळे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख महावीर कांबळे आदी उपस्थित होते.
आयुक्त म्हणाले, सात दिवसात ५०० मी. मी. पाऊस झाला असून पवना धरणातील पाणीसाठय़ात २३ टक्के वाढ झाली आहे. नदीत पाणी भरपूर आहे आणि पाऊसही पडतो आहे. या पाश्र्वभूमीवर, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या संमतीने गुरूवारपासून एकवेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, इतर र्निबध कायम राहणार आहेत. नागरिकांनी पिण्याचे पाणी इतर कामांसाठी वापरू नये, असे ते म्हणाले. नागरिकांनी आतापर्यंत केले, तसे सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन मंगला कदम, महेश लांडगे यांनी केले. नळाला मोटारी लावू नयेत, त्यामुळे इतरांना पाणी मिळत नाही, असे राजू मिसाळ म्हणाले. आवश्यकतेप्रमाणे सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे महावीर कांबळे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा