‘दलित चळवळ आज मुख्य उद्दिष्टापासून बहकली आहे. त्यात नाना अंतर्विरोध निर्माण झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय शहाणपण या चळवळीने आज घेतलेले नाही.’ असे मत ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केले.
पुणे महापालिकेतर्फे ढसाळ यांना महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते पहिला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी ढसाळ बोलत होते. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, ‘आयबीएन लोकमत’चे संपादक निखिल वागळे, ‘सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार उल्हास पवार, लेखक अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर या वेळी उपस्थित होते.
ढसाळ म्हणाले, ‘‘या पुरस्काराने माझ्या डोक्यावरील बोजा वाढला आहे. भौतिक अर्थाने जरी ही माझ्या आयुष्याची संध्याकाळ असली तरी मी घरी बसणारा प्राणी नव्हे!  जोपर्यंत स्मृतिभ्रंश होत नाही तोपर्यंत मी मैदानातच राहणार आहे! स्वातंत्र्याला ६५ वर्षे उलटली तरी आजही समाजात आठशे प्रमुख जाती आणि सहा हजार उपजाती आहेत. आपल्या संमिश्र समाजाला एकसंध करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी कायम टाळलेली आहे. बाबासाहेबांनी आपल्याला जिथपर्यंत आणून पोहोचविले होते तिथेच आपण आजही आहोत. आज राजकीय पक्षांना समाज अभिसरणाच्या उकळ्या फुटत आहेत. दलित चळवळ मुख्य उद्दिष्टापासून बहकली आहे. त्यात अंतर्विरोध  निर्माण झालेले आहेत. केवळ दलितांनीच एकत्र येऊन भागणार नाही. सवर्णातील सद्विवेकी माणूसही त्यांत जोडला गेला पाहिजे. शोषित वर्गातील तरुणांनी कोणत्याही पक्षात जावे. मात्र आपल्या समाजाच्या उद्धारासाठी त्यांना पक्षप्रमुखांना वेठीस धरता आले पाहिजे.’’ पुरस्काराच्या रकमेतील पन्नास हजार रुपये ढसाळ यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिले.
वागळे म्हणाले, ‘‘चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रानेच ढसाळ यांची उपेक्षा केली होती. मात्र ढसाळ यांनी मराठीला नवी शब्दकळा दिली आहे. त्यांना मी केवळ दलित कवी समजत नाही. मराठी कविता जगाच्या व्यासपीठावर पोहोचविणारा हा महाकवी आहे. १९७० पूर्वीचा आक्रोश आणि वेदना आजही त्यांच्या कवितेत दिसते.’’
आठवले म्हणाले, ‘‘ढसाळ यांच्या कवितेतील शब्द कोणत्याही शब्दकोषात सापडणार नाहीत. आमचा शब्दकोष गावाबाहेरचा आहे! सत्ता कुणाचीही असली तरी माणसाला माणूस म्हणून जगता येणे आवश्यक आहे. अजूनही समाजातील जातीवाद गेलेला नाही. जातीवाद नाहीसा करण्यासाठी आंतरजातीय विवाहांना पाठिंबा देणे आवश्यक आहे.’’ आसाराम बापू व त्यांच्या अनुयायांनी नागपूर येथे साजऱ्या केलेल्या होळीच्या समारंभात झालेल्या पाण्याच्या गैरवापराबद्दल आठवले यांनी निषेध व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा