शिवशक्ती-भीमशक्ती महायुतीचा गजर करीत यापूर्वी शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या दलित पँथर संघटनेने आता शिवसेनेपासून फारकत घेतली आहे. त्याचप्रमाणे भांडवलदारांची तळी उचलत स्त्रिया आणि दलितांना उपेक्षेची वागणूक देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आणि पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे संघटना समर्थन करणार नसल्याचे दलित पँथरच्या नूतन अध्यक्षा मलिका नामदेव ढसाळ यांनी सोमवारी सांगितले.
संघटनेने निवडणुकीची रणनीती अजून निश्चित केलेली नाही, असे सांगून मलिका नामदेव ढसाळ म्हणाल्या, त्या वेळच्या परिस्थितीनुसार नामदेव ढसाळ यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत आधी तिकीट देऊन नंतर आपल्या उमेदवारासाठी माघार घ्यायला लावताना ढसाळ यांना दिलेल्या वागणुकीमुळे शिवसेनेने आता दलित पँथरचा पाठिंबा गृहीत धरू नये. मोदी यांच्या सत्तेवर येण्यामुळे अल्पसंख्याक जनता कधीच सुरक्षित नसेल. त्यामुळे मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे संघटना कधीच समर्थन करणार नाही.
बेरोजगारी विरोधात धडक मोर्चा काढून अनुशेष भरणे, बेकारभत्ता सुरू करण्यासाठी आंदोलन, जातपंचायतीमध्ये एक तरी दलित समाजाचा कार्यकर्ता असावा यासाठीचा आग्रह, गलिच्छ वस्ती निर्मूलन कायद्याद्वारे दुर्बल घटकांसाठी ४०० चौरस फुटांचे घर मिळावे असे विविध कार्यक्रम संघटना हाती घेणार असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले.
ढसाळांचे छायाचित्र वापरण्यास मनाई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरण्यास शिवसेनेतर्फे मनाई करण्यात आली होती. त्याचे अनुकरण करीत दलित पँथरने नामदेव ढसाळ यांचे छायाचित्र, बोधचिन्ह आणि संघटनेचे नाव दुसऱ्या कोणीही वापरल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मलिका नामदेव ढसाळ यांनी दिला.
दलित पँथरची शिवसेनेपासून फारकत!
विधान परिषदेच्या निवडणुकीत आधी तिकीट देऊन नंतर आपल्या उमेदवारासाठी माघार घ्यायला लावताना ढसाळ यांना दिलेल्या वागणुकीमुळे शिवसेनेने आता दलित पँथरचा पाठिंबा गृहीत धरू नये.
आणखी वाचा
First published on: 18-03-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalit panther namdeo dhasal shiv sena bjp