पिंपरी: पावसामुळे शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे २८ जुलैला पहाटे साडेतीन वाजता ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे गावातील ओढ्यांना पूर आला. दाभाडे मळा, भागडी रस्ता, पारगाव रस्ता, मधलामळा, आंबेवाडी येथील शेतातील बांध फुटून शेतीचे व कांद्यांच्या चाळींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेगावातील लोणी-धामणी, शिरदाळे येथे अशीच परिस्थिती आहे. येथील बटाटा, वाटाणा, सोयाबीन, बाजरीचे बरेच नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाकडून लवकर पंचनामे करावेत व संबंधित शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून मदत मिळावी. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी या पत्रात केली आहे.