दत्ता जाधव
पुणे : राज्यात ४ ते ९ मार्च आणि १५ ते १९ मार्च या काळात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे २५ जिल्ह्यांतील एक लाख ३९ हजार २२२ हेक्टरवरील काढणीला आलेली रब्बी पिके, फळपिके आणि पालेभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे पुढील दोन दिवसांत पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत.
पंचनामे करून संबंधित अहवाल राज्य सरकारला पाठविला जाईल. बाधितांना नियमानुसार मिळणारी मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल. केंद्र सरकारची मदत घ्यावयाची ठरल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) विभागाचे पथक येऊन तपासणी करेल, असे कृषी संचालक, (विकास आणि विस्तार) विकास पाटील यांनी सांगितले. कृषी खात्याच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने पंचनामा झालेल्या बाधित क्षेत्राची जिल्हानिहाय माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २३८२१ हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्याखालोखाल जालन्यात १५०८० हेक्टर आणि नगर जिल्ह्यात १२१९८ हेक्टर, तर बीडमध्ये ११३५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लातूर जिल्ह्यात ११७९५ हेक्टर, धुळय़ात ९०१७ हेक्टर, जळगावात ९५२९ हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७७६२ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. यवतमाळमध्ये ६५३९ हेक्टर, हिंगोलीत ५६०४ हेक्टर, नाशिकमध्ये ४२७५ हेक्टर, वाशिमध्ये ४९८१ हेक्टर, बुलढाण्यात ३१४७ हेक्टर, पालघरमध्ये २०१७ हेक्टर, नंदुरबारमध्ये १८१४ हेक्टर, सोलापुरात ३९७७ हेक्टर, अमरावतीत १५१७ हेक्टर, परभणीत २४०० हेक्टर, अकोल्यात ६४३ हेक्टर, साताऱ्यात ४८४ हेक्टर, पुण्यात ५७९ हेक्टर, ठाण्यात ११७ हेक्टर आणि वध्र्यात सर्वात कमी ८६ हेक्टरवरील विविध पिकांची अतोनात हानी झाली आहे.
’ अवकाळीच्या पहिल्या (४ ते ९ मार्च) तडाख्यात ३८,६६४ हेक्टर आणि १५ ते १९ मार्च या दुसऱ्या तडाख्यात एक लाख ५५८ हेक्टरवर नुकसान.
’ काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डािळब, केळी, पपईची मोठय़ा प्रमाणावर हानी.
’ ज्वारीचा कडबाही (चारा) भिजला, दर्जा खालावल्यामुळे जनावरांच्या वर्षभराच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर.
‘येत्या दोन दिवसांत पंचनामे करू’
मुंबई : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. येत्या दोन दिवसांत ते काम पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. मदतीला होणाऱ्या विलंबावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरत सभात्याग केला.
संप काळातही कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे तीन दिवसांत बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले जातील. – विकास पाटील, कृषी संचालक, विकास आणि विस्तार