पुणे : पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’वर गेल्या दीड महिन्यांपासून उभे असलेले एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान अखेर गुरूवारी संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर २४ तासांतच हे विमान संरक्षण खात्याच्या जागेत हलविण्याची परवानगी मिळाली. या विमानाला हलविल्यामुळे पुणे विमानतळावरील ये-जा करणाऱ्या विमानांचा विलंब टळणार आहे. यामुळे पुणेकरांच्या हवाई प्रवासातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या वाहतुकीवर झाला होता. शिवाय ही ‘पार्किंग बे’ वापरात नसल्यामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडले होते. या विमानाच्या दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता असल्याने ते तात्पुरत्या स्वरुपात संरक्षण दलाच्या जागेवर हलविण्याचा पर्याय उपलब्ध होता. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त विमान संरक्षण दलाच्या जागेत हलविण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची चर्चा झाली होती.

हेही वाचा…पुणे शहरातील ‘इतक्याच’ पबकडे आवश्यक परवाने… अनधिकृत बांधकामांवरील धडक कारवाई सुरूच…

याबाबत मोहोळ म्हणाले की, अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष ‘पार्किंग बे’वर पाहणी केल्यानंतर संरक्षण खात्याच्या जागेत हे विमान हलविण्याचा पर्याय समोर आला. त्यानंतर तातडीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठविले आणि त्यांची भेटही घेतली. भेटीच्या २४ तासांच्या आतच ही कार्यवाही झाल्याने पुणेकर हवाई प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा…पालखी सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त, पाच हजार पोलीस तैनात; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोहळ्यावर नजर

एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान हटवल्याने विमानतळावरील विमानांचे कोलमडलेले वेळापत्रक पुन्हा जागेवर येईल. विमानतळावरील १० पैकी १ ‘पार्किंग बे’ बंद असल्याचा मोठा परिणाम झाला होता. एका दिवसाला एका ‘पार्किंग बे’वर ८ ते ९ विमानांची ये-जा होत असते. मात्र एक ‘पार्किंग बे’ बंद असल्याने याचा अतिरिक्त ताण इतर ९ ‘पार्किंग बे’वर आला होता आणि याचमुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडले होते, असे नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.