पुणे : सदाशिव पेठेत भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालणाऱ्या महिला पोलिसांच्या ‘दामिनी पथकां’च्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे दामिनी पथकांना पिस्तुले देण्यात येणार असून, या पथकांबरोबरच गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातील तपास पथके, तसेच गस्त घालणाऱ्या पथकांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
शहरात गस्त घालणाऱ्या महिला पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात येणार आहे. अनुचित प्रकार घडल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस दलात प्रत्येकाला पिस्तूल, बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या पोलिसांचा नियमित सराव नसतो. पिस्तूल चालविण्याचा सराव पोलीस कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदाच करावा लागतो.
हेही वाचा >>> छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; काेल्हापूरमधील तरुण ताब्यात
शहरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे दामिनी पथकासह गुन्हे शाखा, तसेच पोलीस ठाण्यातील तपास पथकातील (डिटेक्शन ब्रँच) पोलीस कर्मचाऱ्यांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वाहनांची तोडफोड, कोयते उगारून दहशत माजविणे, महिलांची छेड काढण्याचे गुन्हे घडल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. शहरातील गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्य आहेत.
नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना
शस्त्रसज्ज पोलिसांचा वावर दिसल्यास गुन्हेगारांना धाक बसतो. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना तयार होते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी तपास पथकासह दामिनी पथकातील महिला पोलिसांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना पिस्तूलही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.