कोंढव्यातील तीव्र उताराचा आणि अरुंद रस्ता.. याच उतारावर एका महिलेचा दुचाकीवरील ताबा सुटला, खांबाला धडकून तिचा मृत्यू झाला.. काही महिन्यांपूर्वीची ही घटना. इतक्या धोकादायक रस्त्याला येऊन मिळणाऱ्या एका रस्त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यात या भागातील माननीयांनी जास्तीचे लक्ष घातले आणि हे घडवून आणले. आता नागरिकांनी या रस्त्याला विरोध केला आहे, कारण हे सारे एका बांधकाम व्यावसायिकाच्या हितसंबंधांसाठी करण्यात आले असून, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक आणखी धोकादायक बनली आहे, असा त्यांचा आरोप आहे.
कोंढवा येथील व्हीआयआयटी महाविद्यालयापासून कोंढवा बुद्रुक गावठाणात जाण्यासाठी एक रस्ता आहे. त्याला मोठा उतार आहे. तसेच, त्याची रुंदी अतिशय कमी आहे. त्यामुळे तेथून वाहनांना जपून जा-ये करावी लागते. मोठा उतार असल्याने तेथे अपघात होण्याचा धोका असतो. या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला. उतारावरून येत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने ती खांबावर धडकली होती.
हा असा धोकादायक रस्ता आहे. या रस्त्यावर असलेल्या लक्ष्मीनगर भागात एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याला जाण्यासाठी याच रस्त्यावरून जाणाऱ्या रस्त्याला अलीकडेच मंजुरी देण्यात आली. त्यासाठी त्या भागातील माननीयांनी प्रयत्न केले आणि ही परवानगी मिळवून दिली, असा आरोप या भागातील कार्यकर्ते दादाश्री कामठे यांनी केला आहे. आधीच धोकादायक असलेली वाहतूक या नव्याने होणाऱ्या रस्त्यामुळे अधिक धोकादायक बनेल. संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे हितसंबंध जपण्यासाठीच या धोकादायक रस्त्याला मंजुरी देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
वास्तविक पाहता या ठिकाणाच्या पुढे शंभर फुटांवरही एक रस्ता आहे. तरीही मध्येच या रस्त्याला परवानगी देण्यात आली आहे. याच ठिकाणी लक्ष्मीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी देखील आहे. यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता आणखी वाढते. सध्या सर्वच कामे सुरू असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी फारच धोकादायक बनला आहे. ही बाब विचारात घेऊन महानगरपालिकेने यामध्ये लक्ष घालावे आणि त्या भागातील नागरिकांचा धोका कमी करावा, अशी मागणीही कामठे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा