९० इमारतींना नोटिसा; २९ इमारती नागरिकांनी स्वत:हून पाडल्या  

पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक इमारतींकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याची बाब समोर आली आहे. केवळ कागदी सोपस्कार पूर्ण करण्यात समाधान मानणाऱ्या अधिकाऱ्यांनी ठोस अशी कार्यवाही केलीच नसल्याचे या निमित्ताने दिसून येते. शहरात जवळपास ९९ इमारती धोकादायक असल्याची नोंद पालिकेकडे आहे. त्यातील ९० इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून धोकादायक वाटल्याने २९ इमारती संबंधित नागरिकांनीच पाडल्या आहेत. महापालिकेने मात्र स्वत:हून एकही धोकादायक इमारत पाडलेली नाही.

मुंबईत घाटकोपर येथे ‘सिद्धीसाई’ ही चार मजली इमारत मंगळवारी कोसळली आणि त्यात १७ जणांना जीव गमवावा लागला. इमारतीच्या मूळ आराखडय़ात बदल घडवून अधिक बांधकाम करण्याच्या प्रकाराने ही इमारत धोकादायक बनली आणि पुढे ती दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. या पाश्र्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक इमारतींची माहिती घेतली असता, अ, ब, क, ड, इ आणि फ ही सहा क्षेत्रीय कार्यालये मिळून ९९ इमारती धोकादायक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यातील ९० इमारतींना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालयात १०, ब – २७, क – २७, ड – ११, इ – ० आणि फ क्षेत्रीय कार्यालयात १५ असे या नोटिसांचे क्षेत्रीय कार्यालयानुसार वर्गीकरण आहे.

माहितीविषयी शंका

पिंपरी महापालिकेने धोकादायक इमारतींची माहिती तयार ठेवली आहे. ही माहिती वस्तुस्थितीला धरून आहे की नाही, याविषयी शंका उपस्थित केली जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या संदर्भातील जाहीर प्रकटन दिले जाते. वर्षांनुवर्षे तेच ते कागदी घोडे नाचवले जात आहेत. मात्र, कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे धोकादायक इमारतींचा धोका, हा डोक्यावर कायम टांगती तलवार असल्याप्रमाणे आहे. या संदर्भात शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Story img Loader