महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्रातील विविध भागांमधील आठ मराठी पत्रकारांना ‘दर्पण जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहे. हा गौरव समारंभ ६ एप्रिल रोजी केसरी वाडा येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येतील.
पंढरीनाथ जाधव, मधुकर भावे (मुंबई), राजाभाऊ लिमये (रत्नागिरी), सुधाकर डोईफोडे (नांदेड), प्रतापसिंह जाधव (कोल्हापूर), चंदुलाल शहा (नाशिक), उत्तम कांबळे, सुधीर गाडगीळ (पुणे) या पत्रकारांचा आणि संपादकांचा गौरव करण्यात येणार आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त हा गौरव करण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच, पत्रकार कल्याण निधी आणि एलिमेन्ट्स ऑफ नेचर कॉन्झरवेसन असोसिएशन (एन्का) यांच्यातर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘पश्चिम घाटमाथा एक सुवर्णठेवा’ या प्रकल्पाचा शुभारंभ या वेळी करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री फौजिया खान आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.