पुणे : आषाढी एकादशीनिमित्त सुलेखनातून साकारलेल्या ‘अक्षर विठ्ठल’चे दर्शन पुणेकरांना कला प्रदर्शनाद्वारे घडणार आहे. सुलेखनकार सुमित काटकर यांनी अक्षराच्या माध्यमातून साकारलेली विठ्ठलाची विविध रूपे मंगळवारपासून (५ जुलै) भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनामध्ये पाहावयास मिळतील.
कोथरुड येथील हॅप्पी कॉलनीमधील पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरी येथे सुमित काटकर यांच्या पहिल्या कॅलिग्राफी कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी-गीतकार वैभव जोशी यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव, नोवेल इंटरनशनल स्कूल व कलारंग कला संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे आणि एस. ए. आर. इंडस्ट्रीजचे संचालक अतुल इनामदार या वेळी उपस्थित राहणार आहेत. रविवारपर्यंत (१० जुलै) दररोज सकाळी अकरा ते रात्री साडेआठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
फाईन आर्ट्समधून पदवी शिक्षण पूर्ण करून जाहिरात क्षेत्रात दहा वर्षे कार्यरत असलेल्या सुमित काटकर यांनी ‘सुलेखन’ म्हणजेच कॅलिग्राफी विषयात प्राविण्य मिळविले आहे. अक्षरांमधून विट्ठलाची विविध रूपे साकारत त्यांनी रेखाटलेली ६० चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.