कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पर्वतीवरील श्री देवदेवेश्वर संस्थानच्या कार्तिक स्वामी मंदिरामध्ये सोमवारी (७ नोव्हेंबर) दुपारपासून दर्शन घेता येणार आहे. पौर्णिमा समाप्तीनंतरही बुधवारी (९ नोव्हेंबर) पहाटे तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल.
हेही वाचा >>>पुणे : अठरा वाहनतळांवर सौर ऊर्जेतून ई-चार्जिंगचा प्रयोग
पर्वतीवरील कार्तिक स्वामी मंदिर भारतातील एक प्रमुख मंदिर असून त्याला अडीचशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. या मंदिराची निर्मिती राघोबा दादा पेशवे यांनी केली होती. दरवर्षी हजारो भाविक या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात.कार्तिकी पौर्णिमा सोमवारी दुपारी ४ वाजून १७ मिनिटांनी सुरू होत असून त्यानंतर कार्तिक स्वामी उत्सव सुरू होत आहे. मंगळवारी (८ नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजून ३२ मिनिटांनी पौर्णिमा संपत आहे. कृतिका नक्षत्र मंगळवारी मध्यरात्री १ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होऊन बुधवारी (९ नोव्हेंबर) पहाटे ३ वाजून ०९ मिनिटांनी कृतिका नक्षत्राचा कालावधी संपणार आहे. या कालावधीत भाविकांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येईल. संस्थानच्या धोरणनुसार पर्यावरण आणि पक्षी संवर्धनाच्या हेतूने कार्तिक स्वामींना मोरपीस वाहण्यास अनुमती नाही. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येताना मोरपीस जवळ बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.