हिंजवडी परिसरातील अवैध धंद्यांना पोलिसांचा आशीर्वाद?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या कंपन्या असलेल्या हिंजवडी आणि वाकड भागात अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या मोकळय़ा जागांवर रस्त्याच्या आडबाजूला हातभट्टी विक्रेत्यांनी धंदे थाटले असून त्याचा त्रास आयटी कंपन्यांमधील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांना होत आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच हे धंदे फोफावले आहेत, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

हिंजवडी भागात अनेक ठिकाणी नवीन बांधकामे होत असून या बांधकामाच्या ठिकाणी मोठय़ा संख्येने परप्रांतीय मजूर वास्तव्यास आहेत. संध्याकाळी काम संपल्यानंतर हे मजूर हातभट्टीच्या अड्डय़ावर जात असतात. त्यामुळेच येथे मोठय़ा प्रमाणावर हा व्यवसाय फोफावला आहे. संध्याकाळनंतर या भागात मद्यपींचा धुडगूस सुरू असतो. शंकर कलाटेनगर भागात असलेल्या (हॉटेल सयाजीच्या मागे) एका सोसायटीलगतच एकाने हातभट्टीची दारू तयार करण्याचा धंदा सुरू केला आहे.

या जागेवरच दारू तयार करून ती तेथे विकली जाते. या भागात दारू तयार करणाऱ्यांची दहशत असल्याने रहिवासी भयभीत झाले आहे. हातभट्टीत गाळण्यात येणाऱ्या दारूचा दर्प या भागात सातत्याने पसरल्याने त्याचा त्रास रहिवाशांना होतो. अशा प्रकराच्या अनेक समस्यांबद्दलचे निवेदनही रहिवाशांनी पोलीस उपायुक्त (परिमंडल तीन), सहायक पोलीस आयुक्त कार्यालय (चतु:शंृगी विभाग) आणि वाकड पोलीस ठाण्यात दिले आहे. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

या परिसात असलेल्या सोसायटय़ांमधील महिलांना दारूधंद्यांमुळे परिसरात कोठेही जाण्याची भीती वाटते. हातभट्टीच्या अड्डय़ांवर सतत भांडणे आणि प्रसंगी हाणामारीही सुरू असते. या सर्वच प्रकारांनी स्थानिक नागरिक हैराण झाले असून अवैध दारूविक्री धंद्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी रहिवाशांची आहे.