लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: ओंकारेश्वर घाटावरील खोलीतून चोरट्यांनी दशक्रिया विधीसाठी लागणाऱ्या साहित्य चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत अथर्व प्रशांत मोघे (वय २०) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेकडून ओंकारेश्वर घाटावर दशक्रिया विधीसाठी इमारत बांधण्यात आली आहे. अथर्व मोघे पौरोहित्य करतात. दशक्रिया विधीसाठी लागणारे साहित्य घाटावरील महापालिकेच्या खोलीत ठेवण्यात आले आहे. चोरट्यांनी खोलीचे कुलूप तोडून दहा ताम्हण, १९ पळ्या, छोटे ताम्हण, दोन तांबे असे साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक ढमे तपास करत आहेत.