तब्बल सोळा तासांनंतर दसऱ्याची सांगता; खंडा उचलणे स्पध्रेत अमोल खोमणे प्रथम
हजारो भाविकांच्या भक्तिभावाला आलेले उधाण.. मधूनच सदानंदाचा येळकोट असा होणारा जयघोष.. रात्रीला भेदून आकाशाकडे झेपावणाऱ्या रंगीत तोफा.. दरीमध्ये घुमणारा फटाक्यांचा आवाज.. अशा वातावरणात खंडोबाच्या सेवेतून साजरा झालेला पारंपरिक भेटाभेटीचा सोहळा पाहाण्यासाठी जेजुरीतील ग्रामस्थ व भाविकांनी बुधवारची सारी रात्र डोंगरातच घालविली. रमण्यामध्ये कडेपठारची पालखी व खंडोबा गडातील पालखी यांची भेट रात्री अडीच वाजता झाली. तरुणांच्या सहभागाने व उत्साहाने झालेला जेजुरीचा हा मर्दानी दसरा तब्बल सोळा तास सुरू होता.
जेजुरीत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता खंडोबा गडावर मुख्य पेशवे इनामदार यांनी सूचना देताच मानकऱ्यांनी पालखी खांद्यावर उचलून घेतली. भंडारघरातून सातभाई व बारभाई पुजारी यांनी खंडोबा व म्हाळसादेवीच्या मूर्ती आणून पालखीत ठेवल्या. सदानंदाचा येळकोट या जयघोषाने सारा परिसर या वेळी दुमदुमला. सर्वत्र भंडारा व सोने उधळल्याने ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ या उक्तीचा साऱ्यांना प्रत्यय आला. ही पालखी नंतर डोंगर दरीतील रमणा या ठिकाणी नेण्यात आली. पारंपरिक वाद्ये वाजवीत, फटाक्यांची आतषबाजी करीत पालखी पुढे सरकत होती. दोन्ही पालख्यांसमोर हवाई नळे, भुईनळे मोठय़ा प्रमाणामध्ये उडविण्यात आले. नगरपालिकेसमोर उभ्या केलेल्या रावणाचे दहन बुधवारी पहाटे करण्यात आल्यानंतर पालखीसमोर प्रचंड फटाके उडविण्यात आले. मुस्लीम बांधवांनी फुलांच्या पायघडय़ा घालून पालखीचे स्वागत केले. पानसरे परिवाराने पानाचा विडा देवाला अर्पण केला. पहाटे धनगर बांधवांनी खंडोबा गडाच्या पायथ्याशी सुंबरान मांडले होते. जुन्या धनगरी ओव्या व गाणी म्हणण्यात आली. पालखीने गडामध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक कलावंतांनी देवापुढे गाणी, लावण्या, सोले म्हणून हजेरी लावली. पालखी नाचवत खेळवत भंडारघरात नेण्यात आली. तेथे रोजमोरा (ज्वारी) वाटप झाले. खंडा स्पर्धा झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता दसरा सोहळ्याची सांगता झाली.
खंडा उचलणे स्पध्रेत अमोल खोमणे प्रथम
जेजुरीत बुधवारी सकाळी आठ वाजता पुजारी विलास बारभाई व विश्वस्तांनी खंडा पूजन केल्यावर मोठय़ा उत्साहत स्पर्धा सुरू झाली. खंडा उचलणे स्पध्रेत अमोल खोमणे याने तब्बल १६ मिनिटे २२ सेकंद तलवार एका हातात उचलून धरली. कसरतीमध्ये स्पर्धकांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. एका हातात तलवार पकडून ती युद्धात फिरवता तशी फिरवणे, दातात तलवार धरून उठाबशा काढणे, करंगळीने तलवार उचलणे, मनगटावर तलवार तोलून धरणे आदी कसरती या वेळी करण्यात आल्या. विजेत्यांना खंडोबा देवस्थानतर्फे रोख रक्कम व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.गडामधील खंडा शुद्ध पोलादापासून बनवलेला असून तो पेशवाईच्या काळात सोनोरीचे सरदार रामराव व महीपतराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केला आहे. सरदार पानसे यांचे वंशजही या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पानसे परिवाराकडून विजेत्यांना देण्यात आली.