पुणे : केवळ सात दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षेची प्रवेशपत्रे समाजमाध्यमांत लीक झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकारावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले. तसेच येत्या ३० एप्रिलला होणाऱ्या संबंधित परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तात्काळ रद्द करून दुसऱ्या प्रश्नपत्रिका आयोगाने काढून लवकरात लवकर परीक्षा घ्यावी, तसेच या प्रकाराची सखोल न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता हनुमंत पवार म्हणाले, की महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अवघ्या सात दिवसांत होणार आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे असलेले लाखो विद्यार्थ्यांचे या परीक्षेचे प्रवेशपत्र कोणीतरी समाज माध्यमावर टाकतो, केवळ प्रवेशपत्रच नाही तर विद्यार्थ्यांची आयोगाकडे असलेली सर्व माहिती आणि सदरील परीक्षेची प्रश्नपत्रिकाही आपल्याकडे असल्याचा दावा करतो हे खूप गंभीर आणि आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

हेही वाचा – पुणे : मासळी, चिकनचे दर वाढले

आयोगाकडे असलेले प्रवेशपत्र समाजमाध्यमावर अपलोड करणाऱ्या व्यक्तीकडे कसे, संबंधित परीक्षेची प्रश्नपत्रिका या व्यक्तीकडे आहे का, ती त्याने काही व्यक्ती, विद्यार्थी यांना पाठवली का, संबंधित व्यक्तीच्या दाव्यानंतर लगेच तासाभरात आयोगाने अशी कोणती शहानिशा, चौकशी केली की ज्या आधारे आयोगाने नोटिफिकेशन काढून परीक्षा नियोजित वेळीच होईल आणि प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा निर्वाळा दिला, असे प्रश्नही पवार यांनी उपस्थित केले.

हेही वाचा – पुणे : उकाडा वाढल्याने बाजारात खरबूज, कलिंगडला मागणी

घडलेल्या प्रकाराची सखोल न्यायालयीन चौकशी करावी, येत्या ३० एप्रिलला होणाऱ्या संबंधित परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तात्काळ रद्द करून दुसऱ्या प्रश्नपत्रिका आयोगाने काढून लवकरात लवकर परीक्षा घ्यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाच्या सर्व सदस्य, कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून यांच्यापैकी कोणाचा यात सहभाग आहे का हे तपासावे, राज्य सरकारने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही आणि परीक्षा नि:पक्षपातीपणे होतील याची व्यवस्था करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Data leak of mpsc candidates after that congress made this demand pune print news ccp 14 ssb
Show comments