ऐनवेळी तारखा काढून घेण्याच्या प्रकारांमुळे अनेकांना मनस्ताप
पिंपरी महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाटय़गृहातील ‘तारखांचे घोळ’ ही मोठी डोकेदुखी बनली आहे. राजकीय पक्षांकडून तसेच महापालिकेकडून कोणतेही सबळ कारण न देता ऐनवेळी तारखा काढून घेण्यात येत असल्याने अनेक आयोजक, शाळा तसेच कार्यक्रम घेणाऱ्या संस्थांना तीव्र मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. या ठिकाणी व्यवस्थापकही नसल्याने मोठा सावळा गोंधळ असून ही समस्या आणखी जटिल बनली आहे.
मध्यवर्ती व सर्वार्थाने सोयीचे असल्याने मोरे नाटय़गृहाला खूप मागणी आहे. येथे कार्यक्रम घेण्यासाठी तारीख मिळवणे, हे एकप्रकारचे दिव्य मानले जाते. शनिवार आणि रविवारची सुट्टीची तारीख मिळवण्यासाठी नाटक कंपन्या आग्रही असतात. मात्र, त्यांना अभावानेच अशा तारखा मिळतात. एखादी तारीख मिळालीच तर ती शेवटपर्यंत राहील, याची शाश्वती नसते. नाटकांना दिलेल्या तारखा काढून घेण्याचे असंख्य प्रकार यापूर्वी घडले आहेत. कधी राजकीय पक्षांनी तर कधी महापालिकेनेच नाटक कंपन्यांवर तसेच इतर आयोजकांवर दबाव आणून तारखा काढून घेतल्या आहेत. महापालिकेने जेव्हा तारीख काढून घेतली, तेव्हा पालिकेचा कोणताही कार्यक्रम नव्हता, हे अनेकदा नंतर उघड झाले आहे.
सातत्याने तारखांची समस्या भेडसावत असल्याने चिंचवड नाटय़गृहात नाटकांचे प्रयोग न करण्याचा पवित्रा नाटक कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र, सत्ताधारी नेत्यांनी मध्यस्थी केली आणि सुट्टीच्या दिवशी फक्त नाटकांसाठी तारखा राखीव ठेवण्याचे धोरण जाहीर केले. त्यानंतर नाटक कंपन्यांनी आपला पवित्रा बदलला. मात्र, घोषणेनुसार पुढील कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे जुन्याच पद्धतीचा सावळागोंधळ सुरू आहे. वाकडच्या एका इंग्रजी शाळेची तारीख काढून घेतली म्हणून येथील व्यवस्थापकाला तडकाफडकी सामोरे जावे लागले. मात्र, त्यानंतरही तोच उद्योग कायम आहे. येत्या दोन डिसेंबरची तारीख एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यासाठी ‘मोकळी’ करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. या पक्षाचा राज्यस्तरीय नेता येणार असल्याचे कारण देत या तारखेवर गदा आणण्यात आली. त्यामुळे या दिवशी तीन कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे, तीन डिसेंबरला (रविवार) दुपारी अपंगदिनानिमित्त असणारा अपंगांसाठीचा कार्यक्रम व एका नाटकाची तारीख काढून घेण्यात आली आहे. महापालिकेचा कार्यक्रम आहे, असे कारण त्यांना देण्यात आले आहे. मात्र, पालिकेचा कोणता कार्यक्रम आहे, याची कोणालाही माहिती नाही.