पुणे : पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव अखेर बदलण्यात आले आहे. या पोलीस ठाण्याची ओळख आता दत्तवाडी ऐवजी पर्वती पोलीस ठाणे अशी असणार आहे. पर्वती टेकडी परिसराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या कक्ष अधिकारी असलेल्या रूपाली कबरे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
काही वर्षांपूर्वी स्वारगेट पोलीस ठाण्याचे विभाजन करून दत्तवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. २००६-२००७ या दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्यात एक हजारांहून अधिक गुन्हे दाखल होत होते. त्यामुळे वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन २००७ मध्येच दत्तवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. त्यासाठी पर्वती परिसरात नवीन इमारत बांधण्यात आली आणि दत्तवाडी पोलीस ठाणे असे नामकरणही करण्यात आले होते.
हेही वाचा >>> पुणेकरांसाठी पाणीबाणी, टँकरमाफियांसाठी पाणीच पाणी
दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्तवाडी परिसरात आधीपासूनच दत्तवाडी पोलीस चौकी अस्तित्वात होती. त्यामुळे नामसाधर्म्यम्यामुळे अनेक नागरिक दत्तवाडी पोलीस ठाण्याऐवजी दत्तवाडी पोलीस चौकीतच जात होते. अनेकांचा गोंधळही होत होता. त्यामुळे दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलून पर्वती करण्यात यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात होती. त्यानुसार अखेर दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलून पर्वती पोलीस ठाणे करण्यात आले आहे.