पुण्यातील कर्वेनगरमध्ये शाहू कॉलनी येथे एक तरुणीने आईसोबत परिसरातील गाड्यांची तोडफोड केली. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यावर घटनास्थळी बीट मार्शल दाखल झाले आणि त्यांनी तरुणीसह तिच्या आईला पोलीस स्टेशनला नेले. मात्र, या तरुणीने पोलीस चौकीत राडा घालत महिला पोलीस कर्मचार्याला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आरोपी तरुणीचं नाव मृणाल किरण पाटील (वय २१) आणि तिच्या आईचं नाव संजना किरण पाटील (वय ४०) असे आहे. सुनिता दळवी यांनी या महिलांविरोधात पोलीस तक्रार दिली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुनिता दळवी या आरोपी संजना किरण पाटील व तिची मुलगी मृणाल किरण पाटील यांच्या शेजारी आहेत. तक्रारदार सुनिता दळवी यांच्या कुत्र्याने आरोपी पाटील यांच्या दारात घाण केली. त्यावरून पाटील आणि दळवी यांच्यात वाद झाला. त्यानंतर संजना आणि मृणाल पाटील या दोघी मायलेकींनी तक्रारदार दळवी यांच्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
पोलीस कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलत मारहाण
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि दोघींना पोलीस चौकीत आणण्यात आले. त्यावर आरोपी मृणाल हिने पोलिसांना माझा गुन्हा काय असा जाब विचारला. त्यावर उपस्थित पोलिसानी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर देखील ती पोलीस कर्मचारी यांना अर्वाच्य भाषेत बोलत होती.
हेही वाचा : धक्कादायक! पुण्यात पोलिसाकडूनच पोलिसाला जीवे मारण्यासाठी थेट सुपारी, कारण काय? वाचा…
आरोपीने महिला पोलीस कर्मचार्यावर हातही उचलला आणि शर्टचे बटण तोडले. त्यानंतर दोन्ही आरोपी महिला पोलीस चौकीमधून निघून गेल्या. वारजे पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.