पुणे : महागड्या औषधांना पर्याय म्हणून जनऔषधांकडे (जेनेरिक) पाहिले जाते. ही औषधे आता नागरिकांना घरपोच मिळणार आहेत. नागरिकांनी मागणी नोंदविल्यानंतर ‘दवाइंडिया’च्या ई-कॉमर्स सेवेद्वारे ६० मिनिटांत ही औषधे नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहेत, अशी माहिती झोटा हेल्थकेअर लिमिटेड ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुजित पॉल यांनी सोमवारी दिली.
झोटा हेल्थकेअर ग्रुपच्या वतीने ‘दवाइंडिया’च्या माध्यमातून नागरिकांना जनऔषधे उपलब्ध करून दिली जातात. यासाठी कंपनीने देशभरात औषध दुकानांचे जाळे उभारले आहे. राज्यात ‘दवाइंडिया’ची १०० हून अधिक औषध दुकाने आहेत तर ४० पेक्षा अधिक वितरक दुकाने आहेत. पुण्यात कंपनीची २८ दुकाने आणि ११ वितरक दुकाने आहेत. याचबरोबर कंपनीने पुण्यातील रास्ता पेठ आणि मुंबईतील मीरा रोड येथे २४ तास सेवा देणारी औषध दुकाने सुरू केली आहेत. आता कंपनीने ‘दवाइंडिया’ उपयोजन (ॲप) सुरू केले असून, १४ प्रादेशिक भाषांमध्ये त्या माध्यमातून सेवा दिली जात आहे, असे डॉ. पॉल यांनी सांगितले.
‘दवाइंडिया’ने पुण्यातही ई-कॉमर्स मंच सुरू केला आहे. ग्राहकाने उपयोजनावर मागणी नोंदविल्यानंतर ६० मिनिटांत नागरिकांना घरपोच औषध मिळू शकणार आहेत. ही औषधे ९० टक्के स्वस्त दरांमध्ये उपलब्ध होणार आहेत. या उपयोजनवर २ हजारपेक्षा जास्त उत्पादने उपलब्ध असून, ग्राहक औषधांचे ब्रँड, घटक किंवा श्रेणीनुसार शोधू शकतात. त्यावर प्रिस्क्रिप्शन अपलोड करू शकतात आणि ६० मिनिटांत घरपोच किंवा १० मिनिटांत स्टोअरवरून जनऔषधे मिळवू शकतात, असे डॉ. पॉल यांनी नमूद केले.
दवाइंडिया उपयोजन (अॅप), हेल्पलाईन किंवा व्हॉट्सअॅपवरून सुलभ औषधांची विक्री करण्याव्यतिरिक्त नोंदणीकृत डॉक्टरांचा मोफत सल्ला, औषध रिफिल अलर्ट आणि फार्मासिस्ट कडून मार्गदर्शन अशी अनेक सुविधाही देत आहे. ‘दवाइंडिया’च्या ऑनलाइन सेवा आता १५ राज्यांतील ६० पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्रात ६०० हून अधिक पिनकोडमध्ये सेवा दिली जात आहे.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत, हा आमचा उद्देश आहे. यासाठी आम्ही देशभरातील आमच्या दालनातून जनऔषधे उपलब्ध करून देत आहोत. आता मोबाईल उपयोजनाच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच औषधे मिळविता येतील.- डॉ. सुजीत पॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोटा हेल्थकेअर ग्रुप