दिवाळी पहाट आणि गुढी पाडवा पहाट या संकल्पना रुजल्यानंतर आता सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीमध्ये ‘नववर्ष पहाट’ ही नवी संकल्पना २०१६ पासून रुजू झाली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्रीचे जागरण झालेले असताना पहाटेच्या थंडीमध्येही अभिजात सुरांचा आनंद लुटण्यासाठी सुमारे चार हजार रसिकांनी आवर्जून हजेरी लावली.
अभिजात सुरांच्या साथीने शुक्रवारी नववर्षांची पहाट रंगली. डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांच्या स्वरांतून सादर झालेल्या नाटय़गीते आणि भजनांनी पुणेकरांची नवीन वर्षांची मंगलमय सुरुवात झाली. सरत्या वर्षांला निरोप देताना ३१ डिसेंबरची रात्र जल्लोषात साजरी करण्याच्या उत्साहात नववर्षांच्या पहिल्या दिवसाची रम्य पहाट अनुभवण्याची संधी या मैफलीने दिले.
दिवाळी पहाट ही संकल्पना पुण्यामध्ये गेल्या दोन तपांपासून रुजली आहे. गेल्या दोन वर्षांपासून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडव्याला ‘गुढी पाडवा पहाट’ हा कार्यक्रमही शहरामध्ये होत आहे. मात्र, १ जानेवारीला नववर्ष पहाट मैफल प्रथमच झाल्यामुळे या कार्यक्रमाविषयी रसिकांबरोबरच संयोजक आणि कलाकारांनाही उत्सुकता होती. रावेतकर ग्रुपतर्फे नववर्ष पहाट या अनोख्या संकल्पनेवरील मैफल प्रथमच आयोजित करण्यात आली होती.
‘अलबेला सजन आयो री’ या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील बंदिशीने राहुल देशपांडे यांनी मैफलीचा प्रारंभ केला. ‘कटय़ार काळजात घुसली’ नाटकातील ‘तेजोनिधी लोहगोल’ आणि याच नावाच्या चित्रपटातील ‘दिल के तपीश’ या गीतांना ‘वन्स मोअर’ मिळाला. आनंद भाटे यांनी ‘जोहार मायबाप जोहार’ आणि ‘अगा वैकुंठीच्या राया’ ही भजने सादर करीत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. नंतर या दोघांनीही एकत्रित भजने सादर केली. त्यांना चैतन्य कुंटे यांनी संवादिनीची, निखिल फाटक यांनी तबल्याची आणि माउली टाकळकर यांनी टाळवादनाची साथ केली. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल रावेतकर यांनी कलाकारांचा सत्कार केला. ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या जल्लोषानंतरही पुणेकरांनी कार्यक्रमास दिलेल्या भरघोस प्रतिसादाने भारावून गेलेल्या राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांनी पुणेकरांच्या संगीत प्रेमाला सलाम केला. १ जानेवारीची पहाट आतापर्यंत अनुभवली नव्हती. या नववर्ष पहाट मैफलीद्वारे एक नवा प्रयोग रसिकांसमोर सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
देवदर्शनसाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा
गुढी पाडवा, दिवाळी आणि दसरा या सणांना देवदर्शन घेण्याची प्रथा आहे. मात्र, देवाचे दर्शन घेऊन नववर्षांचे स्वागत करण्याची संकल्पना नव्यानेच रुजत आहे. पुण्यनगरीचे ग्रामदैवत कसबा गणपती, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, गुंडाचा गणपती आणि चतु:शृंगी या मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे शिवाजी रस्त्यासह शहराच्या मध्य भागामध्ये सकाळपासूनच वाहतुकीची कोंडी झाली होती. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाची रांग मंदिरापासून वळून शितळादेवी पाराच्या पलीकडे गेली होती. नववर्षांरंभ शुक्रवारीच आल्यामुळे अनेक सुवासिनींनी तांबडी जोगेश्वरीची ओटी भरली.
दिवाळी आणि गुढी पाडवा पहाटनंतर आता नववर्ष पहाट
पहाटेच्या थंडीमध्येही अभिजात सुरांचा आनंद लुटण्यासाठी सुमारे चार हजार रसिकांनी आवर्जून हजेरी लावली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 02-01-2016 at 03:19 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dawn new year classical concerts