ज्येष्ठ नागरिकांसाठी पाळणाघर आहे असे म्हटले तर कोणालाही ही थट्टा आहे असे वाटू शकेल. मात्र हे सत्य पुण्यामध्ये साकारले गेले आहे. डावी भुसारी कॉलनी परिसरात चक्क ज्येष्ठ नागरिकांसाठी पाळणाघर कार्यरत असून १५ ते २० ज्येष्ठ त्याचा लाभ घेत आहेत.
‘केअर’ (सेंटर फॉर अॅक्शन, रिसर्च अँड एज्युकेशन) या संस्थेने दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी हे पाळणाघर सुरू केले आहे. त्याच्या मुख्य विश्वस्त अनुराधा करकरे यांनी पाळणाघरामागचा उद्देश सांगितला. कृपा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये १५ वर्षे कार्यरत असताना मला ज्येष्ठ नागरिकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मुलगा, सून दोघेही नोकरी करणारे असल्याने घरात एकटे वावरताना या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या प्रकृतीविषयी काळजी वाटत असते. मनाचा कोंडमारा होतो आणि असुरक्षितताही वाटत असते. या गरजेतूनच लहान मुलांसाठी असते तसे ज्येष्ठांकरिताही पाळणाघर असावे अशी कल्पना सुचली. वैशाली जोशी, मेघना मराठे, रत्नदीप ताम्हाणे या सहकाऱ्यांनीही ही कल्पना उचलून धरली आणि त्यातूनच ‘रेनबो’ डे केअर सेंटर सुरू झाले. या केंद्राच्या पाच किलोमीटर परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणण्यासाठी आम्ही वाहनव्यवस्था केली आहे. दररोज सकाळी ९ ते ५ ही वेळ असलेल्या या केंद्रामध्येच ज्येष्ठांच्या भोजनाची व्यवस्थाही केली जाते. ज्येष्ठांची आवड ध्यानात घेऊन त्यांना आहार दिला जातो. त्यांचे मन रमविण्याच्या उद्देशातून गाणी म्हणणे, म्हणी व वाक्प्रचार ओळखणे, एकाच मोठय़ा शब्दामधून लहान लहान अर्थपूर्ण शब्द तयार करणे, श्लोकपठण, हास्य क्लब, प्राणायाम, हलके व्यायाम या गोष्टींवर भर दिला आहे. संपूर्ण शरीराला व्यायाम होईल, पायांना आराम मिळेल अशी उपकरणेही आम्ही ठेवली आहेत. महिलांसाठी शिवणकाम, भरतकाम, कापडी पिशव्या तयार करणे अशा छंदयुक्त कलांवर भर दिला आहे.’
साधारणपणे ५५ ते ८५ वर्षे वयोगटातील नागरिक येथे येतात. त्यांच्यासाठी दूरचित्रवाणी आणि रेडिओ संच, पत्ते, कॅरम, छोटेखानी ग्रंथालय या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही वेळा सहल आणि ‘निवृत्तीनंतरचे जीवन’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले जाते. काही ज्येष्ठाना ठरावीक वेळी औषधे घ्यावी लागत असल्याने वैद्यकीय सल्लागाराच्या मदतीने त्यांची काळजी घेतली जाते.
गेल्या दीड वर्षांपासून येथे येत असलेल्या ८३ वर्षांच्या चित्तरंजन कारखानीस यांना ‘रेनबो’ हे दुसरे घरच वाटते. माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. येथे आल्यानंतर माझ्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीत सुधारणा झाली. आम्ही सर्व जण एकाच कुटुंबातील आहोत ही भावना आहे. दररोज झेपेल इतपत व्यायाम करतो, झाडांना पाणी देतो आणि खूप आनंदात राहतो, असे कारखानीस यांनी सांगितले. या केंद्रात आल्यानंतर अनेकांच्या मानसिक स्थितीत सुधारणा झाली आहे. घरी आक्रस्ताळेपणा करणारे काही जण येथे समूह कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतात. विनोदी किस्से सांगण्याबरोबरच गाणीही म्हणतात, असेही करकरे यांनी सांगितले.