उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विकासाच्या आलेखाबाबत बोलत असताना अजित पवार यांनी वाढत्या गुन्हेगारीवरही भाष्य केलं. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आजच पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच मी जाहीरपणे सांगतोय अधून-मधून सारखं कोयता गँग ऐकायला मिळतं. कसली आली रे कोयता गँग? या कोयता गँगवाल्यांचा सुपडाच साफ करतो, अशी जाहीर तंबी अजित पवार यांनी दिली.

‘सुप्रिया सुळेंशी का बोलत नाही?’ माध्यमांच्या प्रश्नांवर अजित पवारांनी दिलं भलतंच उत्तर, म्हणाले…

अजित पवार पुढे म्हणाले की, पालकांनीही आपल्या मुलांना जरा सांभाळावं. मी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बसलो असताना अधिकारी आम्हाला सांगत होते की, १२ ते १४ वर्षांची मुलं कोयता, तलवारी घेऊन उगीचच इकडून तिकडे फिरतात. अशांना आम्ही आता जरब बसवणार आहोत. मुलाचं वय कमी असल्यामुळं आम्हाला कायद्याने काही अडचणी येत आहेत. पण यापुढे मुलांच्या पालकांना बोलावून त्यांची मुलं काय दिवे लावत आहेत, हे दाखविणार आहोत.

पालकांनी आपल्या कार्ट्यांना नीट वागायला शिकवायला हवं. काही पालक सांगतात, आम्हाला माहितच नाही आमची मुलं काय करतात. पण मुलांना जन्माला घातल्यानंतर ते काय करतात, कुठे जातात, कसे वागतात हे पाहणं पालकांचं काम आहे. त्यामुळे यापुढच्या काळाता कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. कोणताही मुलगा कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार. उद्या कुणी म्हटलं आमच्या मुलाला पदरात घ्या, तर ते ऐकून घेतलं जाणार नाही. आमचा पदर अन् धोतर दोन्ही फाटलंय. यापुढं गुन्हे करणाऱ्या मुलांना थेट टायरमध्ये टाकून धडा शिकवला जाईल.

“दोन ‘दादां’नीच नगरसेवक निवडून आणले, इतर कुणी…”, व्यासपीठावर सुप्रिया सुळेंसमोर अजित पवारांचं खोचक विधान!

पुणं विद्येचे माहेरघर आहे. पुण्याला एक संस्कृती आहे. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या नावाला, विचारांना काळीमा फासला जाईल, अशी कोणतीही कृती इथे खपवून घेतली जाणार नाही.