पुणे : शिरूर तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व आणि ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्याने या क्षेत्रात स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावा, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय यंत्रणेला केली.
रांजणगावची भविष्यातील गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायत परिसरात मोठ्या क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून निधी देण्यात येईल. त्याचबरोबर ग्रामपंचायतीनेही त्यांच्या हिश्श्यासह कंपन्यांच्या सामाजिक उत्तदायित्व निधीतून (सीएसआर फंड) निधी उभारावा, असेही पवार यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात बैठक झाली. तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डाॅ. राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे उपस्थित होते. पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषतेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजनान पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते.
‘अष्टविनायकापैकी एक असलेला रांजणगाव गणपती राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक उद्योग-व्यवसाय येथे उभे राहिले आहेत. त्यामुळे रांजणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. ही बाब विचारात घेऊन घोड धरणावरून नवीन पाणीपुरठा योजनेच्या कामाला गती द्यावी लागेल. तसेच नागरी सुविधा देण्यासाठी पुरेशा क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावे लागतील. त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दिला जाईल. रांजणगाव, कारेगाव, ढोकसावंगी या ग्रामपंचायतींनी सुचविलेली विकासकामे ‘एमआयडीसी’ मार्फत करावीत,’ अशी सूचनाही पवार यांनी केली.