पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने आलिशान कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील, आजोबा, पब चालक, व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली. यानंतर या आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली. दरम्यान, पोर्श कार अपघात घडला त्यावेळी आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला जात आहे. यावर सुनील टिंगरे यांनीही खुलासा करत हे आरोप फेटाळले. यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत आमदार सुनील टिंगरे यांचा यामध्ये सहभाग आहे की नाही? याबाबत बोलत आमदार सुनील टिंगरे यांची पाठराखण केली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“पोर्श कार अपघात प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर अनेक महत्वाच्या बाबी समोर आल्या. त्यामध्ये आरोपीला जामीन मंजूर झाला. तो जामीन बाल न्यायमंडळाने दिला होता. ही घटना घडल्यानंतर जी कलमं लावण्याची आवश्यकता होती, ती लावण्यात आली. ज्यावेळी या घटनेतील चौकशीला सुरूवात झाली त्यानंतर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन विभागाबद्दल काही सूचना देण्यात आल्या आहेत.या अपघाताच्या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल”, असं अजित पवार यांनी म्हटलं.
हेही वाचा : पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
“अपघाताची घटना घडल्यानंतर दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. त्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. या भागातील आमदार सुनील टिंगरे यांच्यावर विरोधकांनी काही आरोप केले. आता आमदार मतदारसंघात असतात. त्यांच्या मतदारसंघात काही घडलं तर त्यांना तेथे जावं लागतं. त्यांच्याच मतदारसंघात काही काही दिवसांपूर्वी स्पॅल कोसळल्याची घटना घडली होती. त्यामध्ये काहींचा मृत्यू झाला होता. तेव्हाही आमदार सुनील टिंगरे तेथे पोहचले होते. लोकप्रतिनिधी या नात्याने मदत केली. पुण्यात काही घटना घडतात, त्यावेळी पुण्यातील सर्व प्रतिनिधी मदत करतात. ही अपघाताची घटना घडली, त्यानंतर त्यांना कोणाचा फोन आला? याबाबत आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ते पोलीस ठाण्यात आले. मात्र, त्यांनी कोणालाही पाठीशी घातलेलं नाही”, असं अजित पवार म्हणाले. आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप करण्यात येत आहे की त्यांनी दबाव आणला, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, तसं कुठेही झालेलं नाही. सुनील टिंगरे यांच्यावर जे आरोप होत आहेत, ते आरोप बिनबुडाचे आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं. ते आज माध्यमांशी बोलत होते.