पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पार्थ पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात निवड होण्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात सुरुवात झाली. त्या सर्व घडामोडी दरम्यान आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन येथील पुणे जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीला अजित पवार नियोजित वेळेपूर्वी तब्बल अर्धा तास अगोदर आले होते. तर बैठकीच्या ठिकाणी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, संचालक आमदार संजय जगताप, रमेश थोरात हे अजित पवार यांच्यानंतर तब्बल वीस मिनिटांनी आले. यावेळी सर्व संचालकांची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहण्यास मिळाले. ही बैठक तासभर चालली, या बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत बोलणे टाळले.
या बैठकीबाबत अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची दीड वर्षांपूर्वी निवडणुक झाली. त्यावेळी अजित पवार, दिलीप वळसे पाटील हे दोघेजण निवडणुक लढविण्यास इच्छुक नव्हते. पण आमच्या सर्वांच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणुक लढवली. मात्र सध्याचा व्याप लक्षात घेऊन अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. तुम्ही राजीनामा देऊ नका अशी आम्ही सर्वांनी विनंती केल्यावर, अजित पवार यांनी सध्याची परिस्थिती सांगितली. यापुढील काळात देखील माझ्याकडून बॅंकेला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहेन असे त्यांनी सांगितले. आज देखील त्यांनी कामाचा आढावा घेऊन काही सूचना केल्याच यावेळी त्यांनी सांगितले.
हेही वाचा… पुणेकरांची होणार खड्ड्यांतून लवकरच सुटका…महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय
अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर पार्थ पवार संचालक म्हणून संधी अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची बारामती ‘अ’ गटातून अजित पवार यांनी निवडणुक लढवली होती. पण त्यांनी आता संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ती जागा रिक्त झाली असून तो राजीनामा सहकार निवडणूक प्राधिकरण विभागाकडे जाईल. त्यानंतर संचालक निवड प्रक्रियेची सुरुवात होईल. तसेच पार्थ पवार हे संचालक म्हणून यावेत. ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र अजित पवार जो उमेदवार देतील तो अंतिम असेल, अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.