Maharashtra DCM Ajit pawar Speech : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने ६३ व्या द्राक्ष परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांची तुफान टोलेबाजी झाली. त्यावर एकच हशा पिकला. मद्याविषयी बोलत असताना अजित पवार म्हणाले मी अद्याप दारुला स्पर्शही केलेला नाही. जेव्हा अजित पवार यांनी हे वाक्य उच्चारलं तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

देशी दारुच्या दुकानांना वाईन शॉप म्हटलं जातं. त्यामुळे काहींचा असा समज झाला की सरकार वाईनची दुकानं वाटणार का? मुळात वाईनची दुकानं आणि द्राक्षापासून तयार केली जाणारी वाईन यामध्ये फरक आहे. काही देशांमध्ये तर वाईन हा पाण्याला असणारा पर्याय आहे. मी हे सगळं अधिकारवाणीने सांगतोय कारण मी अद्याप दारुला स्पर्शही केलेला नाही.

दर्दी लोक सांगतात इतर काही गोष्ट घेतली की किक बसते, वाईनने किक बसत नाही. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मी कधीच त्या गोष्टीला स्पर्श केला नाही. माझ्या सोबत काम करणाऱ्या अनेकांना माहिती आहे असंही अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मी अर्थमंत्री अन उपमुख्यमंत्री असल्यानं तुम्ही मला आज मोठेपण दिलं. आता तुम्ही अजित पवारला आज बोलावलं, का बोलावलं? कारण अजित पवारकडे अर्थ खातं आहे. उपमुख्यमंत्री पद आहे. त्याच्याकडून आपलं काम होईल, म्हणून त्याला मोठेपण दिलं. त्याला ही वाटेल द्राक्ष बागायतदार आपल्याला विसरला नाही. तुमच्या जागी मी असतो तर हेच केलं असतं, असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

शरद पवारांनीही या द्राक्ष परिषदेला हजेरी लावली होती. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदरणीय शरद पवारसाहेब नेहमीच तुमच्या मदतीला धावले. ते कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतात. म्हणूनच या परिषदेच्या शुभारंभाला शरद पवारसाहेब आले होते. आज समारोपाला अजित पवार आलेत. आता सगळे म्हणतील काय पवार-पवार चालवलंय. मुळातच तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमनचं शिवाजी पवारच आहेत! आता सगळेच पवार म्हटल्यावर पवारांचं चाललंय काय? अशी चर्चा रंगणार, असं म्हणत अजित पवार यांनी टोलेबाजी केली. अजित पवार यांनी काल पिंपरीत केलेल्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar speech about wine said i never touched it scj