पिंपरी: मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सहा आणि सात जानेवारी रोजी पिंपरी चिंचवडमध्ये ऐतिहासिक शंभरावे नाट्यसंमेलन होणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी आकुर्डीत झाले. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पी.डी.पाटील, कृष्णकुमार गोयल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यावेळी उपस्थित होते.
यावेळी भाषण करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. ‘नाटक क्षेत्रातील मान्यवरांनी नाटक चांगल्या पद्धतीने करत रहावे. राजकारण आमच्यासाठी ठेवा, नाटके तुम्ही करा, राजकारण आम्ही करतो. राजकारणात असलेल्यांमध्ये चांगला नट असावा लागतो असे म्हटले जाते. त्यामुळे आम्हा राजकारण्यांमध्ये सुद्धा अनेक कसलेले नटसम्राट आहेत. ते नाटकवाल्यांना सुद्धा मागे टाकतील. सावर्जनिक जीवनातील पात्र रंगवत, वटवत असल्याचा अनुभव तुम्ही अनेक वर्षे घेत आहात. कोणाच्या बाबतीत, कसा, काय घेताहेत, याच्या खोलात मी जास्त जात नाही, असे पवार म्हणाले.
हेही वाचा… VIDEO: दारूवाला पूल परिसरातील गादी कारखान्याला आग
पवार म्हणाले, संमेलनासाठी सर्व शाखांना मिळून दहा कोटी रुपयांची मदत केली आहे. हे शंभरावे संमेलन वेगळ्या उंचीवर पोहोचेल. उद्योगनगरीची वाटचाल सांस्कृतिकनगरीकडे चालली आहे. आवश्यक तिथे महापालिकेने ताकदीने मदत करावी. जिल्हा नियोजन समितीमधून मदत केली जाईल. आमदारही मदत करणार आहेत. मराठी नाटकाचा इतिहास चारशे वर्षांचा जुना आहे. नाटक हे पहिले प्रेम आहे. मराठी नाटकांनी केवळ मनोरंजन केले नाही तर इतिहास नव्या पिढीला सांगितला. करोना काळात नाटकाच्या घंटा थांबल्या होत्या. प्रत्येक शहरात एक थेटर असावा असा आमचा प्रयत्न चालू आहे. नाट्यगृहाची स्वच्छता, मेकअप खोलीची दुरवस्था झालेली असते. त्याकडे आयुक्तांनी लक्ष दिले पाहिजे.