पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे ९ आमदारांसह २ जुलै रोजी सहभागी झाल्याच्या घटनेला जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला. या दरम्यान राज्यात होणार्या अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रित यावे, अशी भावना अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी बोलून दाखविली आहे.
हेही वाचा : मेट्रोच्या कामामुळे औंधकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल
या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतली. दिवाळी सणाच्या शुभेच्छा देत दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याशी काही काळ चर्चा देखील केली. तर शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आजच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात नियोजित बैठक होती. त्या निमित्ताने शरद पवार यांची भेट घेतली. रयत शिक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या बदली संदर्भात किंवा माझ्या नावाचा बदल या संदर्भात काही चर्चा झाली नाही. मी पहिल्यापासून साहेबांचे मार्गदर्शन घेत आलो आहे आणि आज देखील साहेबांचे मार्गदर्शन घेतले. बारामती येथे पाडव्याला जाण्याबाबत ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : पिंपरी :महापालिका ठेकेदारावर मेहरबान; मोशी रुग्णालयाच्या वाढीव दराच्या निविदेला प्रशासनाची मान्यता
या सर्व घडामोडी दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे विमानतळ येथून खासगी विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण अजित पवार यांना मागील काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाल्याने त्यांनी भेटीगाठी नाकारल्या होत्या. पण अचानक अजित पवार दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याने नेमक्या कोणत्या कारणास्तव अजित पवार दिल्लीला गेले आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.