पुणे : तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.
राम मंदिर उद्गाटनाचा मुद्दा भाजपकडून लोकसभेच्या तयारीसाठी वापरला जात असल्याबद्दल विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा हा राम भक्तांचा, कारसेवकांची, रामावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. श्रद्धा असलेला प्रत्येक जण या सोहळ्यासाठी जात आहे. याबद्दल कोणालाच दु:ख होण्याचे कोणतेच कारण नाही.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शनासाठी जात आहे. याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे कुठल्याही मंदिरात चालले हेही नसे थोडके.