Pune MPSC Student Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन सुरु केलं आहे. तसेच नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. २५ तारखेची परीक्षा पुढे ढकण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यामध्ये २५८ कृषी पदांचा समावेश करावा, अशी मागणी या आंदोलक विद्यार्थ्यांची आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आणि आयबीपीएसची परीक्षाही एकाच दिवशी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावं लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून २५ तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (ट्विटर) यासंदर्भात माहिती देत विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात ठिय्या आंदोलन; नेमकं कारण काय?

देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट काय?

“आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत होणार बैठक

स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यात आंदोलन सुरु केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच आयबीपीएसची परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत बैठक घेत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे.