शिरूर : शिवसेनेत असताना ठाण्यात एकत्र काम केलेल्या ‘लाडक्या मित्रा’साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिरूर तालुक्यातील कान्हूर गावात येत मित्राच्या वाड्याला भेट देतानाच गावातील मेसाई देवीचे दर्शन घेतले. या भेटीच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी शिंदे यांच्या ठाणे ते कान्हूर या मोटारसायकल, तसेच टेम्पोतून केलेल्या प्रवासाला उजाळा मिळाला. राजकीय व्यग्रतेतून वेळ काढत आग्रहास्तव शिंदे मित्रासाठी आल्याने पंचक्रोशीत या ‘लाडक्या मित्रां’च्या मैत्रीची चर्चा रंगली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील मूळचे असलेले शिवसेना नेते पोपट धोत्रे आणि माजी नगरसेवक चिंतामणी धोत्रे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात वास्तव्यास आहेत. धोत्रे कुटुंबीय आणि शिंदे यांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. धोत्रे कुटुंबीय मेसाई देवीच्या दर्शनासाठी कान्हूर येथे येतात. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण दिले होते. ते स्वीकारून शिंदे बुधवारी कान्हूरमध्ये आले. एक तासाच्या भेटीत त्यांनी धोत्रे कुटुंबीय, मित्र परिवाराशी संवाद साधला. ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देताना शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेच्या आवारात वृक्षारोपणही केले.

हेही वाचा >>> सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’; बतावणी करुन  ३८ लाखांची फसवणूक

शिंदे यांच्या स्वागतासाठी धोत्रे कुटुंबीयांनी घराची पडवी सुंदर फुलांनी सजवली होती. औक्षण करून शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. शिंदे घरी आल्याचा आनंद धोत्रे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर झळकत होता. शिंदे यांनीही कुटुंबातील सदस्यांची आस्थेने चौकशी केली. अनेक सदस्यांना शिंदे यांच्याबरोबर छायाचित्र घेण्याचा मोह आवरला नाही. शिंदे यांच्यासमवेत विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनावणे, शिवसेनेचे स्थानिक नेते अनिल काशिद, रामभाऊ सासवडे, मयूर थोरात उपस्थित होते. शिंदे शिरूर तालुक्यात येणार असल्याने मोठी गर्दीही झाली होती.

हेही वाचा >>> पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती

‘शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्यासमवेत शिंदे आणि मी एकत्र काम केले होते. सन १९८५ मध्ये ठाणे येथील किसननगर भागात शिंदे शाखाप्रमुख, तर मी शाखा उपप्रमुख होतो. त्यांच्यासमवेत मी राहिलो आहे. आम्ही दोघेही एक रिक्षा वेगवेगळ्या पाळीत चालवीत होतो,’ अशी आठवण पोपट धोत्रे यांनी नमूद केली. एकनाथ शिंदे यापूर्वीही घरी देवीच्या यात्रेसाठी आले होते. एका वर्षी तर त्यांनी मोटारसायकलवरून प्रवास केला होता. त्यानंतर एकदा टेम्पोतून प्रवास करून ते कान्हूरला आले होते. मैत्रीच्या आग्रहास्तव मोठा व्याप असतानाही ते आल्याने शिंदे यांनी मैत्री काय असते, हे दाखवून दिले आहे, अशी भावनाही धोत्रे यांनी व्यक्त केली.

ठाणे येथील धोत्रे परिवार यात्रेसाठी गावी येत असतो. यात्रेच्या अनेक आठवणी आहेत. धोत्रे परिवार प्रेमळ असून, त्यांना भेटून आनंद झाला. यापूर्वीही अनेकदा यात्रेसाठी आलो होतो. – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm eknath shinde visit in kanhur village of shirur taluka to meet friend popat dhotre pune print news apk 13 zws