लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पिंपळे निलख स्मशानभूमी येथून वाहणार्या मुळा नदीपात्रात दुषित व रसायनमिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला असताना महापालिका पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्यावतीने महापालिका पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना मृत मासे भेट देण्यात आले.
पिंपळे निलख स्मशानभूमी येथून वाहणार्या मुळा नदिपात्रात दुषित व रसायनमिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला आहे. महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्याकडून केवळ दिखाऊपणाची कारवाई केली जाते. गेल्या वर्षीसुद्धा पवना नदीपात्रात केजुबाई धरण येथे मृत माशांचा खच आढळून आला होता. हे सर्व वारंवार घडत आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
आणखी वाचा-शिक्षकांना टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ… काय आहे निर्णय?
मुळा नदी वाकड, कस्पटे वस्ती, विशालनगर, पिंपळे निलख, सांगवी या ठिकाणाहून वाहते. या नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणावर दुषित झाले आहे. शहरातून वाहणार्या तीनही नदीपात्रावर असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे रविराज काळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना भेटून केली. तसेच, पर्यावरण विभागचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना मृत मासे भेट दिले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीचे पात्र २४ किलो मीटर, इंद्रायणीचे १९ आणि मुळा नदीचे १० किलो मीटर आहे. या नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नदी सुधार प्रकल्प केवळ कागदावर आहे.