पुणे : दौंड शहरात मृतावस्थेत नवजात अर्भक, तसेच अर्भकाचे काही अवयव सापडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी दौंंड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
याबाबत दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई महादेव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिले्लया फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास दौंडमधील गोपाळवाडी परिसरातील एचपी पेट्रोल पंपाजवळ मोकळ्या जागेत एक नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले. नवजात अर्भक बाटलीत ठेवण्यात आले होते, तसेच या परिसरात फेकून देण्यात आलेल्या सात ते आठ बाटल्यांमध्ये नवजात अर्भकांचे अवयव ठेवण्यात आले होते.
या भागतील नागरिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बाटलीत ठेवलेले नवजात अर्भक, तसेच अन्य बाटल्यांमध्ये ठेवलेले अवयव ताब्यात घेतले. संबंधित अवयव आाणि नवजात अर्भक वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले.
पोलिसांनी या भागातील नागरिकांची चौकशी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पाेलीस उपनिरीक्षक बिद्री तपास करत आहेत.
दौंंडमधील गोपाळवाडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले, तसेच अर्भकाचे अवयव बाटल्यांमध्ये भरून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. – बापूराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड