पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या ३० जून २०२२च्या शासन निर्णयानुसार राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबीयांना ‘शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’मध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्यासाठी, तसेच नावातील स्पेलिंग किंवा जात संवर्ग दुरूस्ती उमेदवारांना १० ऑगस्टपर्यंत करता येईल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरताना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद घेण्यात आलेली नाही. तसेच नावातील स्पेलिंग बदल आणि जातसंवर्ग बदल करण्याबाबत उमेदवारांकडून निवेदने परीक्षा परिषदेकडे आली होती. त्याचीच दखल घेऊन परीक्षा परिषदेने उमेदवारांच्या नावातील स्पेलिंग किंवा जात संवर्ग या संदर्भातील दुरूस्तीसाठी, माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याची सुविधा https://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या लॉगिंनमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नावातील स्पेलिंग बदल करण्यासाठी दहावी प्रमाणपत्र, जात संवर्ग बदलासाठी जात प्रमाणपत्र, माजी सैनिक आरक्षणाकरिता सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी लेखी किंवा ई-मेलद्वारे निवेदन दिले असल्यास उमेदवारांनी पुन्हा लॉगिनमध्ये अद्ययावत करणे आवश्यक आहे. तसेच, दिलेल्या मुदतीनंतर किंवा अन्य प्रकारे आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दुरुस्ती प्रक्रिया झाल्यावर निकाल
टीईटीचा निकाल कधी जाहीर होणार याची उमेदवारांना प्रतीक्षा आहे. मात्र, सर्व दुरूस्त्यांचा विचार करून परीक्षेचा निकाल लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.