लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : महापालिकेच्या वतीने हाती घेतलेल्या डेअरी फार्म येथील उड्डाणपूल बांधण्याचे काम मुदत संपली, तरी अपूर्ण आहे. मुदतीत केवळ ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात येणार आहे.
पिंपरीतील डेअरी फार्म येथील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला मार्च २०२३ मध्ये कार्यादेश देण्यात आला होता. या कामाची मुदत दोन वर्षांची म्हणजेच ३१ मार्च २०२५ पर्यंत होती. पुलाचे काम मुदतीत पूर्ण झाले नाही. पुलाच्या बांधणीसाठी काही वृक्ष अडथळा ठरत असल्याने कामास विलंब झाला. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे एप्रिल २०२३ मध्ये वृक्षतोड व पुनर्रोपणासाठी सादर केलेल्या प्रस्तावास ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी मिळाली.
पुलाच्या जागेत अडथळा ठरणारे १४२ वृक्ष काढण्यात आले, तर ६४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. मंजूर आराखड्यातील जागेतील काही वृक्ष संरक्षण विभागाच्या हद्दीत असल्याने त्यांचे मूल्यांकन करून संरक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागली. वन विभागाने सप्टेंबर २०२३मध्ये मूल्यांकन पूर्ण केले. मार्च २०२४ मध्ये वृक्षतोडीस परवानगी मिळाल्यानंतर मे २०२४ मध्ये १४२ वृक्ष काढण्यात आले. तसेच नोव्हेंबर २०२४ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ६४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आल्याचे प्रकल्प विभागाने सांगितले.
हा पूल रेल्वे विभागाशी संलग्न असल्याने विविध मंजुरी प्रक्रियांमध्ये देखील विलंब झाला. रेल्वे विभागाच्या ओव्हर हेड इक्विपमेंट (ओएचई) व इतर संरचना बदलण्यासाठी आवश्यक मंजुरी व निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कामासाठी रेल्वे विभागाने ७४.८९ लाख आगाऊ रकमेची मागणी केली असून, त्याची प्रक्रिया पूर्ण करून रक्कम दिली आहे. सद्य:स्थितीत रेल्वे विभागाच्या मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात प्रक्रिया सुरू आहे.
सध्या सर्व विभागांशी समन्वय साधून आता काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यावर भर आहे. या कामातील अडथळ्यांमुळे होणारा विलंब लक्षात घेता ठेकेदाराने पुलाच्या कामासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. सर्व बाबींचा विचार करून आयुक्तांच्या मान्यतेने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.
वाहनचालकांना दिलासा
पिंपरी डेअरी फार्म येथील लोहमार्गावर उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. हा पूल खुला झाल्यानंतर पिंपरीतील डेअरी फार्म, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी आणि पिंपरी गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेच्या परवानगीसाठी विलंब झाल्याने पुलाचे काम मुदतीत पूर्ण झाले नाही. ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.